भाईंदर :- एकेकाळी मिरा भाईंदर शहरावर वर्चस्व असणारे माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांचा पाठिंबा मिळविण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चढाओढ लागली आहे. शिवसेनेत प्रवेश केलेल्या मेन्डोन्सा यांनी मात्र अद्याप कुठल्या गटाला पाठिंबा दिलेला नाही किंवा आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरा भाईंदर शहराच्या राजकारणात माजी आमदार गिल्बर्ट मेन्डोन्सा यांचा मोठा प्रभाव आहे. ग्रामपंचायत काळापासून मेन्डोन्सा यांचे शहरावर वर्चस्व होते. ग्रामपंचायत ते महापालिकेच्या विविध पदांवर मेन्डोन्सा कुटुंबीयांनी प्रमुख पदे भूषवली होती. मात्र २०१४ मध्ये भाजप पक्षाचे आमदार नरेंद्र मेहता यांनी विधानसभा निवडणुकीत मेन्डोन्सा यांना पराभूत केले होते. दरम्यान २०१६ साली घोडबंदर येथील एका जमिनीच्या प्रकरणात त्यांना अटक झाल्यानंतर त्यांच्या राजकीय कारकिर्दीला उतरती कळा लागली होती. त्यांचा वारसा चालविणारे कुटुंबातून कुणी सक्षम नसल्याने त्यांचे शहरातील महत्व हळूहळू कमी झाले. मात्र आजही मिरा भाईंदर शहरात मेन्डोन्सा यांचा दबदबा असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. भाईदरमधील ख्रिस्ती, कोळी मतदारांमध्ये त्याचे वजन असून त्यांच्याकडे असलेली मते निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. त्यामुळे आगमी लोकसभा निवडणुकीत ठाणे मतदारसंघाचा भाग असलेल्या मिरा भाईंदर शहरातून मेन्डोन्सा यांच्या मदतीने मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी महायुती व महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरु झाली आहे.

हेही वाचा – रायगडमध्ये सुनील तटकरेंना उमेदवारी, भाजपमध्ये निराशा

गिल्बर्ट मेन्डोन्सा हे राष्ट्रवादी पक्षाचे माजी आमदार असल्यामुळे त्यांचे पूर्वीपासून राष्ट्रवादी पक्षाचे नेते शरद पवार यांच्याशी जवळचे संबंध आहेत. मात्र नाईक कुटुंबीयांशी असलेल्या नाराजीमुळे त्यांनी पक्ष सोडला होता. तुरुंगात असताना त्यांना तत्कालीन शिवसनेचे नेते एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनी मदत केल्याने त्यांनी बाहेर येताच शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता. आता देखील मेन्डोन्सा हे शिवसेनेमध्ये असून आपल्याच बाजूने असल्याचा विश्वास राजन विचारे यांना आहे. परंतु दुसरीकडे मेन्डोन्सा यांनी शिंदे यांना समर्थन दिले असल्याचा दावा शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अद्याप मेन्डोन्सा यांनी आपली भूमिका जाहीर केलेली नाही.

हेही वाचा – आयारामांची संख्या वाढल्याने भाजप नेते अस्वस्थ; भविष्यातील राजकारण धोक्यात…

हेही वाचा – मंत्री सुधीर मुनगंटीवारांकडे केवळ ९० हजार रुपये रोख, बंगल्याची किंमत ५ कोटी ६० लाख, चारचाकी वाहन नाही…

याबाबत प्रत्यक्ष मेन्डोन्सा यांच्याशी संपर्क होऊ शकला नसला तरी त्यांच्याशी या विषयावर बोलणे झाले नसल्याची प्रतिक्रिया त्यांची मुलगी माजी महापौर कॅटलीन परेरा यांनी दिली आहे. मेन्डोन्सा यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी महायुती तसेच महाविकास आघाडी असे दोघांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे मेन्डोन्सा हे काय भूमिका घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.