लोकसत्ता वार्ताहर
भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेचा पर्यावरण अहवाल सादर करण्यासाठी प्रशासनाला मुहूर्त मिळत नसल्याची बाब समोर आली आहे. अहवाल सादर करण्याची मुदत संपून आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. प्रशासन पर्यावरण संरक्षणाला घेऊन गंभीर नसल्यामुळे ही परिस्थिती असल्याची तक्रार पर्यावरण प्रेमींकडून करण्यात आली आहे.
मिरा, भाईंदर शहरातील विविध भागातील हवा, ध्वनी, जल प्रदूषणाची शास्त्रीयदृष्ट्या चाचणी करून नागरिकांना प्रदूषणमुक्त जीवन जगण्यासाठी वातावरण तयार करण्याची जबाबदारी पालिकेवर आहे. त्यामुळे दरवर्षी महापालिकेकडून पर्यावरण अहवाल तयार केला जातो. साधारण ३१ जुलै पूर्वी हा अहवाल प्रसिद्ध करण्याचे शासनाचे सक्त आदेश आहेत. मात्र मागील वर्षभरापासून विविध कारणांमुळे हा अहवाल तयार करण्याकडे दुर्लक्ष झाले आहे. परिणामी मुदतवेळ होऊन आठ महिन्यांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतरही हा अहवाल प्रसिद्ध होऊ शकलेला नाही.
प्रशासनाचे म्हणणे…
प्रामुख्याने खासगी संस्थेच्या मदतीने महापलिका हा अहवाल तयार करते. पर्यावरणातील विविध घटकांचा अभ्यास आणि त्याचे प्रमाणबद्ध मूल्यांकन करून पर्यावरण सद्यस्थिती अहवाल सादर केला जातो. लोकजागृती हा त्याच्या मागचा एक उद्देश आहे. सध्याच्या घडीला अहवाल तयार झालेला असून केवळ आयुक्तांच्या मंजुरीनंतर तो प्रसिद्ध केला जाणार असल्याची माहिती पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे.
मिरा-भाईंदर महापालिकेचा पर्यावरण अहवाल तयार करण्यात आलेला आहे. लवकरच आयुक्तांच्या मंजुरीनंतर तो प्रसिद्ध केला जाईल. -युगेश गुणिजन, सहाय्यक आयुक्त, पर्यावरण विभाग
विलंबाचे कारण?
मिरा-भाईंदर महापालिकेचा पर्यावरण अहवाल हा खासगी संस्थेच्या मदतीने तयार करण्यात येत आहे. यात संस्थेने नमूद केलेल्या घटकांची फेरतपासणी पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून करण्यात आली आहे. हे काम साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस पूर्ण झाले होते. मात्र तत्कालीन आयुक्त संजय काटकर हे प्रशिक्षण दौऱ्यावर गेल्यामुळे यास मंजूरी रखडली होती. दरम्यान काटकर यांची बदली झाल्यानंतर नव्या आयुक्त राधा बिन शर्मा यांच्यापुढे हा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर यास मंजुरी मिळाल्यानंतर तो प्रसिद्ध केला जाईल, अशी माहिती पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे.
वृक्षतोडीत वाढ
मिरा-भाईंदर शहरातील हरित पट्ट्याचे संरक्षण व्हावे तसेच नागरिकांना प्रदूषणमुक्त शहर मिळावे म्हणून महापालिकेने स्वतंत्र पर्यावरण विभागाची उभारणी केली आहे. मात्र मागील वर्षभरात शहरातील चार हजारांहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आल्यानंतरही पर्यावरण विभागाने कोणतेही ठोस कारवाई केली नसल्याची तक्रार पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.