लोकसत्ता प्रतिनिधी
वसई: नायगाव रेल्वे उड्डाणपूलावरून भरधाव वेगाने जाणारी एक दुचाकी पुलाचा कठडा तोडून खाली कोसळली. या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अतुल दुबळा (२०) असे या अपघाता मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
अतुल दुबळा हा तरूण नायगाव पश्चिमेच्या वडवली येथे राहात होता. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नायगाव पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या उड्डाणपूलावरून दुचाकीवर आपल्या साथीदारासह निघाला होता. मात्र भरधाव वेगाने जात असताना उड्डाण पुलावरील वळणावर त्याचे नियंत्रण सुटून अपघात घडला. या अपघातात दुचाकी स्वार थेट पुलावरून खाली कोसळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा साथीदार राहुल डबले हा जखमी झाला आहे. या प्रकरणी माणिकपूर पोलिसांनी अपघाताची मृत्यूची नोंद केली आहे.
आणखी वाचा-वसईतील महायुतीमध्ये धुसफूस; शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष नाराज
लोखंडी सुरक्षा कठडे (सेफ्टी रेलिंग) बसविण्याकडे पाठ
नायगाव उड्डाणपूलाला एमएमआरडीएने फक्त रेल्वेवरील भागात उंच सुरक्षा कठडे बसविलेले आहेत. मात्र उर्वरित उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस व पश्चिमेकडील उतारमार्गिकेवर असलेले आर.सी.सी. सुरक्षा कठडे कमी उंचीचे आहेत. या मार्गावरून काही वाहनचालक भरधाव वेगाने जातात. तर काही जण कठड्याजवळ नागरिक थांबतात. याशिवाय उड्डाणपुलावर दोन घातक वळणेही आहेत, ज्यांचा अंदाज वाहनचालकांना लगेच येत नाही. परिणामी अपघात झाल्यास कमी उंचीच्या सुरक्षा कठड्यांमुळे पुलावरून कोसळून दुर्घटना होऊ शकते. यासाठी कठड्याला सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लोखंडी सुरक्षा कठडे (सेफ्टी रेलिंग) बसविण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी केली होती. मात्र त्याकडे एमएमआरडीएने पाठ फिरवल्याने अशा घडत आहेत असा आरोप नागरिकांनी केला आहे.