विरार : वसई विरारमध्ये बर्डफ्ल्यूचा शिरकाव झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. अर्नाळा आणि वसईतील काही भागांत मागील आठवडाभरात ८०० हून कोंबडय़ांचा अचानक मृत्यू झाल्याने मयत कोंबडय़ांचे नमुने भोपाळ येथील केंद्रीय प्रयोगशाळेत चाचणीसाठी पाठवले असता सर्व अहवाल सकारात्मक आल्याची माहिती जिल्हा पशु संवर्धन विभागाने शुक्रवारी दिली आहे. याच धर्तीवर अर्नाळा परिसरातील १२०० कोंबडय़ांना मारून जमिनीत पुरण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे वसईत बर्डफ्ल्यूचा शिरकाव झाला असून कुकुटपालन व्यावसायिकांच्या चिंता वाढल्या आहेत.
मागील आठवडाभरापासून शहरातील विविध भागात मोठय़ा प्रमाणात शेकडो कोंबडय़ांचा अज्ञात कारणाने मृत्यू होत असल्याने एकच खळबळ माजली होती. विरारमधील अर्नाळा, भंडार आळी, आगाशी ते वाघोली परिसरात तीन दिवसांत ४१५ हून अधिक कोंबडय़ा बदके आणि टर्की कोंबडय़ा अचानक मयत झाल्या. पशु संवर्धन विभागातर्फे मयत कोंबडय़ांचे नमुने पुणे वैद्यकीय शाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. यावेळी पुणे शाळेने कोणत्यातरी साथीच्या तापाने या कोंबडय़ांच्या मृत्यू झाल्याचा अहवाल दिला. यानंतर पुढील चाचणीसाठी भोपाळ येथील वैद्यकीय शाळेत पाठविण्यात आले. यानंतर भोपाळ वैद्यकीय शाळेने या कोंबडय़ांचा मृत्यू बर्डफ्लूने झाला असल्याचे सांगितले. यानंतर प्रशासकीय विभाग खळबळून जागा झाला आणि परिसरात तपासणी सुरू केली. यावेळी अर्नाळा येथील एका कुकुटपालन व्यावसायिकाच्या १२०० कोंबडय़ा संशयित आढळून आल्या. त्यांना तातडीने मारण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
या अगोदर शहापूर तालुक्यात बर्डफ्ल्यूचा शिरकाव झाल्याची माहिती समोर आली. त्यानुसार १५ हजारहून अधिक कोंबडय़ांना मारण्यात आले. बर्डफ्ल्यू मुळे कुकुटपालन व्यवसाय संकटात सापडला आहे. मयत कोंबडय़ात टर्की, गावठी कोंबडय़ा तसेच काही प्रमाणात बदकांचा समावेश आहे. असे असताना नागरिकांनी भीती बाळगू नये असे तसेच घरातील कोंबडय़ांना जैव सुरक्षा वातावरणात ठेवावे, तसेच कुकुटपालन व्यावसायिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन विभागाने केले आहे.