वसई- वसई विरार शहरात भाजपाच्या स्थापना दिवस उत्साहात साजरा झाला असला तरी त्याचा फटका शहरतील झाडांना बसला आहे. या स्थापना दिनानिमित्ता कार्यकर्त्याने शहरभर फलकबाजी करून जागोजागी झेंडे लावले होते. कार्यकर्त्यांनी त्यावरच न थांबता दुभाजकांमध्ये असेलल्या झाडांवरच झेंडे लावले होते. यामुळे शहर तर विद्रूप झाले शिवाय शोभिवंत झाडांवर खिळेमारून झेंडे लावल्याने झाडांनाही इजा झाली आहे. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीत वसईत सत्तापरिवर्तन झाले आहे. ३५ वर्षांनंतर प्रथमच वसई आणि नालासोपारा मध्ये भाजपचे आमदार निवडून आले आहेत. त्यामुळे भाजप कार्यकर्ते उत्साहात आहेत. पक्षाचा कुठलाही कार्यक्रम असला तरी संपूर्ण शहरभर फलकबाजी करण्यात येते. राजकीय दबावामुळे पालिका कारवाई करत नाही. रविवारी भाजपाचा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यानिमित्ताने संपूर्ण शहरात फलकबाजी करण्यात आली होती तसेच जागोजागी झेंडे लावण्यात आले होते. रस्त्यावरी झाडांवर, चौकांवर, नाक्यावर झेंडे लावले होते. रस्त्याच्या दुभाजकामध्ये पालिकेने सुभोभीकरण करून झाडे लावली होती. त्या झाडांवरही उत्साही कार्यकर्त्यांनी झेंडे लावले होते. सोमवारी दिवसभर हे झेंडे तसेच होते. त्यामुळे सुभोभीकरण केलेला परिसर विद्रूप दिसत होता. अनेक ठिकाणी झाडांवर खिळे मारून झेंडे लावले होते. शोभिवंत झाडे ही नाजूक असतात त्यांच्यावरही झेंडे लावल्याने झाडे कोमेजून केल्याचे दिसून आले. याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
माजी सभापती निलेश देशमुख यांनी याबाबत सोमवारी पालिका आयुक्तांकडे तक्रारी केली आहे. भाजप स्वच्छ शहराचा नारा देत असताना दुसरीकडे त्यांचेच कार्यकर्ते अशाप्रकारे शहर सर्वत्र बेकायेदशीर फलकबाजी करून शहर विद्रूप करत आहेत. दुभाजकांवरील झाडांना देखील त्यांनी सोडलं नाही. यावार कारवाई करण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे. आम्ही ज्या ठिकाणी असे फलक लावले आहेत ते काढण्याचे आदेश संबंधित सहाय्यक आयुक्तांना दिले आहे, असे जाहिरात विभागाने सांगितले.
राजकीय पक्षांवर कारवाई करणार का?
वसई विरार महापालिकेने अनधिकृत फलकबाजी करणार्यांविरोधात मोहीम उघडली आहे. मागील तीन महिन्यात ६१० अनधिकृत होर्डींग्ज आणि ५ हजारांहून अधिक अनधिकृत बॅनर्सवर कारवाई करून ते जप्त करण्यात आले आहेत. त्यात खासगी जाहिरातदारांवर फौजदारी गुन्हे दाखल केले जात आहे. मात्र अद्याप एकाही राजकीय पक्षांवर कारवाई केलेली नाही. सत्ताधारी भाजपच्या विरोधात कारवाई करण्याची हिंमत महापालिका दाखवणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.