वसई: वसईतील धान्याचा काळाबाजार करणार्या ५ शिधावाटप दुकानांचे परवाने रद्द करणअयात आले आहे. या रास्तभाव दुकानात येणारे धान्य खासगी बाजारात विकले जात होते. याप्रकरणी माणिकपूर पोलीस ठाण्यात रास्तभाव दुकानदारांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
वसईतही शिधावाटप दुकानात धान्याचा काळाबाजार होत असल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. भारतीय खाद्य निगम कडून येणारे धान्य शिधावाटप केंद्रात न उतरवता ते अन्य ठिकाणी उतरवले जात होते. याप्रकरणी रास्तभाव दुकान चालविणारे जगदंबा महिला बचत गट, जितेंद्र चव्हाण, श्रमिक महिला बचत गट, आदिशक्ती महिला बचत गट आदींविरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात अत्यावश्यक वस्तू अधिनियमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या धान्याचा काळाबाजार प्रकरणाची जिल्हा पुरवठा अधिकार्यांमार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात आली होती. चौकशी मध्ये धान्याचा काळाबाजार होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे रास्तभाव दुकान चालवणारा आनंद जैस्वाल (उमराळे) श्रमिक महिला बचत गट (माणिकपूर), महालक्ष्मी महिला बचत गट ( माणिकपूर) आदिशक्ती महिला बचत गट (माणिकपूर) सरस्वती महिला बचत गट यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. ही रास्तभाव दुकाने नजीकच्या रास्तभाव दुकानाशाी तात्पुरत्या स्वरूपात जोडली जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी पोपट ओमासे यांनी काढलेल्या आदेशात दिली आहे. ज्या दुकानांमध्ये धान्याचा काळाबाजार झाला होता. त्यांची चौकशी त्यांचे शिधावाटप केंद्राचे परवाने रद्द करण्यात आले आहे अशी माहिती वसईच्ये पुरवठा निरीक्षक भागवत सोनार यांनी दिली. यातील सरस्वती महिला बचत गटाच्या अध्यक्षा अश्वनी गुरव या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आहेत.
असा झाला घोटाळा
अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. या धान्याचे वितरण करण्यासाठी वसईत १८० शिधावाटप केंद्र आहेत. भारतीय खाद्य निगम (एफसीआय) बोरीवली येथून धान्य या शिधावाटप दुकानात पोहोचवले जाते आणि नंतर ते नागरिकांना देण्यात येते. मात्र हा ट्रक अन्य ठिकाणी उतरविण्यात येत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. ज्या ठिकाणी धान्य उतरविण्याचे चलन नसतानाही वसईतील धान्य दुकानात धान्याच्या गोणी उतरवल्या जात होत्या. काही दुकानात निश्चित धान्यापेक्षा कमी धान्य उतरविले जात होते. या प्रकाराबाबत वसईतील सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रार पुरवठा विभागाकडे केली होती आणि रंगेहाथ हा घोटाळा उघडकीस आणला होता.