वसई विरार शहरात शिधा वाटप केंद्रावर धान्य वितरण करताना काळाबाजार होत असल्याच्या घटना समोर येत आहेत. काही दुकानदार त्यांच्या वाट्याचे धान्य न देता नाहीत, तर काही वेळा कमी देऊन त्यांच्या हक्काचे धान्य हिरावून घेण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. नुकताच पुरवठा विभागाने तीन शिधा वाटप दुकानांवर धाडी टाकून कारवाई केली आहे. या कारवाईनंतर धान्य वितरणातील काळाबाजार उघड झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देशाला स्वतंत्र होऊन ७५ वर्षाचा कालावधी उलटून गेला असला तरीही गोर गरीब नागरिकांना त्यांच्या हक्कासाठी  संघर्ष करावा लागत आहे. तर दुसरीकडे त्यांच्या वाट्याचे असलेले धान्य ही हिरावून घेण्याचा प्रकार शिधा वाटप केंद्रावर घडू लागले आहे. अशा प्रकारामुळे सर्वसामान्य नागरीकांनी जगायचे कसे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गोरगरीब जनतेला उदरनिर्वाह करता यावा यासाठी शासनाने रास्त भाव दुकानातून सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून दिले आहे. मात्र या धान्य वितरणातील अडचणी वर्षानुवर्षे दूर न झाल्याने आजही वसई विरार मध्ये शहरी व ग्रामीण अनेक ठिकाणच्या भागात धान्य मिळविण्यासाठी नागरिकांना धडपड करावी लागत आहे.

आधीच दिवसेंदिवस वाढत असलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. जितकी काटकसर करून जगता येईल यासाठी संघर्ष सुरू आहे. धान्याच्या किंमतीत ही सतत वाढ होत असल्याने बाजारात  धान्याचे भाव अव्वच्या सव्वा झाले आहेत.इतके महागडे धान्य घेणे अनेकांना परवडत नाही. त्यामुळे रास्त भाव दुकानातून मिळणाऱ्या धान्यावर या नागरिकांना अवलंबून राहावे लागत आहे. विशेषतः मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबांचा यात समावेश आहे. आजही अनेक कुटुंब या मिळालेल्या धान्यावर आपला उदरनिर्वाह करतात.

अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिका धारकांना स्वस्त धान्याचं वितरण केलं जाते. या धान्याचे वितरण पारदर्शक रित्या होण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने त्याचे वितरण १८० शिधावाटप केंद्रावर सुरू आहे.  वसईत  सुमारे १ लाख ४५ हजार ९०६ इतके प्राधान्य कुटुंब लाभार्थी व ३ हजार ८०६ अंत्योदय शिधापत्रिका धारक असून त्यांचे एकूण ५ लाख ९८ हजार ७० इतके शिधा लाभार्थी आहेत.

सुरवातीला पावती द्वारे नोंद करून शिधापत्रिका लाभार्थ्यांना धान्य दिले जात होते. त्यामुळे काही ठिकाणी वितरणात लाभार्थ्यांची फसवणूक होत होती. ती फसवणूक टाळण्यासाठी लाभार्थ्यांच्या ऑनलाइन स्वरूपात नोंदी घेऊन त्यांना धान्याचे वितरण केले जाऊ लागले. त्यानंतर धान्य वितरणात होणारी फसवणूक थांबेल असे वाटले होते.

मात्र तसे न होता अनेक ठिकाणी विविध मार्ग बदलून फसवणूक करण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. शासनाने लाभार्थ्यांच्या वर्गवारी नुसार धान्य ठरवून दिले आहे. अंत्योदय साठी २५ किलो तांदूळ १० किलो गहू मिळणे अपेक्षित आहे. मात्र तांदुळ कमी देऊन गहूच जास्त दिले जात आहेत. त्यातही काही जणांना कमी धान्य दिले जात असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तर काही लाभार्थ्यांना ऑनलाइन स्वरूपात धान्य जास्तीचे धान्य दाखविले जात असतानाही कमीच धान्य साठा दिला जात आहे. दुकानदाराला नंतर चढ्या भावाने बाजारात धान्य विकता यावे यासाठी लाभार्थ्यांच्या वाट्याचे असलेले धान्य लाटण्याचा प्रकार सुरू झाला आहे.

वसईत दिवसेंदिवस धान्य वितरणात गोंधळ वाढू लागला आहे. नुकताच वसईत शिधावाटप दुकानात पुरवठा विभागाने धाडी टाकल्या होत्या. यावेळी धान्याच्या पोत्यांची हेराफेरी सुरू असल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे पुरवठा विभागाने तीन दुकाने सील बंद करून त्यावर कारवाई केली आहे. या केलेल्या कारवाईमुळे शहरातील धान्य वितरणात काळाबाजार होत असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.विशेषतः शहरातील शिधा वाटप दुकाने महिला बचत गटांना चालविण्यास दिली आहेत. मात्र काही ठिकाणी प्रत्यक्षात महिला बचत गटाच्या नावाखाली अन्य दुकानदार ही दुकाने चालवित आहेत. त्यामुळे अशा प्रकारच्या घटना समोर येत असल्याचे बोलले जात आहे.

धान्य वितरणात होणारा गोंधळ रोखण्यासाठी सातत्याने पुरवठा विभागाकडून लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र तसे होत नसल्याने काळाबाजार करणाऱ्यांची मुजोरी अधिकच वाढत आहे. याचा संपूर्ण फटका हा गोरगरिबांना बसत आहे. काही दुकानदार काळाबाजार करीत असल्याने पहाटेपासून धान्यासाठी रांगेत राहिलेल्या लाभार्थ्याला पुरेसे धान्य मिळत नाही. तर काहीवेळा धान्य साठा संपल्याचे कारण दिले जाते.मग त्या लाभार्थ्यांच्या वाट्याचे धान्य गेले कुठे असा प्रश्न साहजिकच निर्माण होतो.धान्य वितरणात होणारा गोंधळ रोखण्यासाठी वेळीच पुरवठा विभागाने सावध होऊन उपाययोजना आखायला हवी.

ऑनलाइन यंत्रणा अद्यावत असायला हवी

डिजिटल इंडियाचा नारा देत पॉसच्या माध्यमातून धान्यवितरण यंत्रणा सुरू केली खरी मात्र बदलत्या काळानुसार ही यंत्रणा अद्यावत होणे गरजेचे आहे. अनेकदा इंटरनेटची रेंज जाणे, तांत्रिक अडथळे येणे, अचानक यंत्र बंद होणे त्यामुळे धान्य वितरणात वारंवार अडचण निर्माण होत आहे. काही यंत्र ही जुनी झाली आहेत त्यामुळे  विहित वेळेत माहिती अद्यवत होण्यासही अडथळे येत आहेत. शिधा वाटप केंद्रावर  धान्य मिळविण्यासाठी लाभार्थी सकाळी पहाटेपासून रांगा लावण्यास जात आहेत. परंतु यंत्र बंद असते अशा वेळी निराश होऊन रिकाम्या हाताने घरी परतावे लागते. यासाठी ऑनलाइन स्वरूपातील यंत्रणा ही अद्यावत करणे गरजेचे आहे.