लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई : नालासोपाऱ्यात शुक्रवारी रात्री दोन गटात झालेल्या हाणामारी प्रकरणात एकूण ११ जणांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा २ च्या पथकाने यातील ५ जणांना तर तुळींज पोलिसांनी ६ जणांना अटक केली आहे. या हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू झाला होता तर ४ जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास नालासोपारा पूर्वेच्या संतोष भवन परिसरात क्षुल्लक वादातुन दोन गटात मारामारी झाली होती. या मारहाणीत दिपक पाल याचा जागीच मृत्यू झाला आहे तर शुभम ठाकूर आणि सलीम यांच्यासह ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील दोघांना कांदिवली येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर ( शताब्दी) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर अन्य दोघांना वसईतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या प्रकरणी तुळींज पोलिसांनी दोन्ही गटातील तरुणांविरोधात हत्या, आणि हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी गुन्हे शाखा २ च्या पथकाचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांच्या पथकाने ५ जणांना अटक केले त्यामध्ये गणेश यादव, (२२) सौरभ शेख (२२) अल्ताफ सिद्दीकी, (२४) आमिर शेख (२४) यांचा समावेश आहे. तुळींज पोलिसांनीही साहिल लोखंडे (२०) शिवा राजभर (२४) यांच्यासह ६ जणांना अटक केली आहे.