वसई- वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने २०२३ मध्ये एकूण १९ बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. यातील अनेक डॉक्टर्स हे वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना, दुसर्याच्या नावावर तसेच मान्यता नसताना ॲलोपॅथी दवाखाना चालवत होते.
वसई विरार शहरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत असून नवनवीन वसाहती तयार होत आहेत. या अनधिकृत बांधकामे असलेल्या परिसरात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला आहे. परराज्यातून मान्यता नसलेल्या वैद्यकीय महाविद्यालयांच्या पदव्या असलेले, कसलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नसलेले ठकसेन डॉक्टर बनून धंद करत आहेत. यामुळे रुग्णांवर चुकीचे उपचार होऊन त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.
हेही वाचा – लोकल सेवेच्या उद्घाटनाची उरण स्थानकात जोरदार तयारी सुरू, फुलांच्या माळांनी स्थानक सजलं
मान्यता नसलेल्या विद्यापीठाची पदवी किंवा प्रमाणपत्र नसताना बेकायदेशीरपणे ते दवाखाना चालवत आहेत. यातील अनेक डॉक्टर्स हे प्रत्यक्षात डॉक्टर्स नसताना तोतयागिरी करून डॉक्टर बनून रुग्णांवर उपचार करत होते. मागील वर्षात पालिकेने अशा बोगस डॉक्टरांविरोधात मोठी कारवाई केली होती. वर्षभरात पालिकेने एकूण १९ बोगस डॉक्टरांवर कारवाई करून त्यांचे दुकान बंद केले होते. या सर्व बोगस डॉक्टरांविरोधात भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४२० सह वैद्यकीय व्यवसाय अधिनियम १९६१ चे कलम ३३, ३३ (ए) व औषधी द्रव्य व सौदर्य प्रसाधन १९४० चे कल १८ (सी) १८ ए, २७ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आला आहे. बोगस डॉक्टरांविरोधातील कारवाई या वर्षात अधिक तीव्र करणार असल्याचे पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी सांगितले.
काही प्रमुख कारवाया
नालासोपारा पूर्वेच्या रिचर्ड कंपाऊंड येथे मोहम्मद बद्रबोजा इनामूल हाका (३४) हा साई क्लिनिक चालवत होता. त्याच्याकडे मान्यता नसलेली नॅशनल पॅरॉमेडिकल काऊन्सिल अॅण्ड वोकेशनल बोर्ड कौशल्य विकास यांच्याकडील इलेक्ट्रोपॅथिची पदवी होती. तरी तो ॲलोपॅथिक डॉक्टर असल्याचे भासवून क्लिनिक चालवत होता. त्याच्या क्लिनिकमध्ये ॲलोपॅथिक औषधे, महागडी उपकरणे आढळून आली.
हेही वाचा – वसई, भाईंदरमध्ये वाढता देहव्यापार; २०२३ मध्ये ५२ गुन्हे, १०४ तरुणींची सुटका
सातिवलीच्या मौर्या नाका येथे दिलीपकुमार शर्मा (५५) हा साई श्रद्धा पॉलिक्लिनिक नावाचा दवाखाना चालवत होता. त्याच्याकडे कसलेही वैद्यकीय प्रमाणपत्र नव्हते. त्याच्याकडे ॲलोपॅथीची औषधे, उपकरणे आढळून आली. वसई पूर्वेच्या हवाई पाडा येथे संतोष झा (२७) याच्या विरोधात वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो दुसऱ्या बीएएमस डॉक्टरच्या नावाने खुशी क्लिनिक चालवत होता. त्याच्या तपासणीत वैद्यकीय प्रमाणपत्र आढळले नाही.
वसई पूर्वेच्या रेंज नाका येथील जानकी पाडामधील संचिता क्लिनिकवर कारवाई करण्यात आली. या क्लिनिकमध्ये अम्रतीकुमार सिक्कदर (४२) हा वैद्यकीय प्रमाणपत्र नसताना दवाखाना चालवत असल्याचे आढळले.