वसई– मिरा रोड येथील दुकानदाराच्या गोळी झाडून करण्यात आलेल्या हत्येचा छडा गुन्हे शाखा १ आणि २ च्या पथकाने संयुक्तपणे लावला आहे. फेरिवाल्यांच्या व्यावसायिक वादातून भावा-बहिणींनी ही हत्या घडवून आणल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोन आरोपी भावांना अटक केली असून त्यांच्या बहिणीला ताब्यात घेतले आहे. प्रत्यक्ष गोळीबार करून फरार झालेल्या हल्लेखाचा शोध सुरू आहे.
मिरा रोड येथील शांती शॉपिंग सेंटर मधील दुकानदार शम्स अन्सारी उर्फ सोनू (३८) याची शुक्रवारी रात्री गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी गुन्हे शाखेचे संयुक्त पथक तयार केले होते. मिरा रोड रेल्वे स्थानकालगत व पादचारी पुलावर अनेक फेरीवाले बसतात. यातील काही फेरीवाल्यांना बसण्यासाठी जागा देण्यावरून मयत शम्स अन्सारी आणि युसूफ आलम यांच्यात वाद होता. त्यामुळे हत्येनंतर युसूफवर संशय होता.
हेही वाचा >>> मिरा रोड गोळीबार प्रकरण, पोलिसांची ७ पथके स्थापन
मोबाईमधील पिस्तुलच्या छायाचित्राने उघड
गुन्हे शाखा २ च्या पथकाने युसूफ आलमच्या बहिणीला ताब्यात घेतले होते. तिच्या चौकशीतून ती काही सुगावा लागू देत नव्हती. मात्र पोलिसांनी तिच्या मोबाईलची तपासणी केली असता एका पिस्तुलाचे छायाचित्र आढळले. त्यावरून पोलिसांनी तिला बोलते केल्यानंतर तिने या हत्येच्या षडयंत्राची कबुली दिली. हल्लेखोरासोबत असणारा तिचा भाऊ सैफ आलम (२२) याला नालासोपारा येथील आपल्या घरात लपवून ठेवले होते. त्याला हत्येनंतर ताब्यात घेऊन अटक केली. त्यानंतर गुन्हे शाखा १ च्या पथकाने बदलापूर येथून युसूफ आलम (३४) याला अटक केली.
हेही वाचा >>> मिरा रोड मध्ये गोळीबारात दुकानदाराचा मृत्यू
..अशी केली हत्या
याबाबत माहिती देताना गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे यांनी सांगितले की, हत्येच्या दिवशी सैफ आलम आणि हल्लेखोर घटनास्थळावर गेले होते. हल्लेखोराने शम्स अन्सारी याच्यावर गोळीबार केल्यानंतर दोघे ट्रेनने वसईला आले. त्यानंतर सैफने हल्लेखोराला अजमेरला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसवले आणि नालासोपार्याच्या डॉन लेन मधील बहिणीच्या घरी जाऊन लपला. सोमवारी युसूफ आणि सैफ आलम या दोन्ही आरोपींना सत्र न्यायालयाने सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील त्यांच्या बहिणीला ताब्यात घेतले असून तिला देखील अटक केली जाणार आहे. सैफ याच्याकडून हत्येसाठी वापरण्यात आलेली गावठी पिस्तुल, मॅगझीन आणि ९ बुलेट जप्त करण्यात आली आहे. पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद बल्लाळ, गुन्हे शाखा १ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरिक्षक अविराज कुर्हाडे, गुन्हे शाखा २ चे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहूराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.