भाईंदर :- वाहतूक नियमांचे तंतोतंत पालन व्हावे व पोलीस कर्मचाऱ्याच्या सुरक्षेत भर पडावी म्हणून अधिकारी व अंमलदाराना आयुक्तालया तर्फे बॉडीवॉर्न कॅमेरे उपलब्ध करून देण्यात आले आहे.यामुळे रस्त्यावर घडणारी प्रत्येक घटना रेकॉर्ड केली जाणार असून वाहतूक नियंत्रण यासह अन्य बाबीवर लक्ष देण्यास मोठी मदत होणार आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रशासकीय यंत्रनांना शंभर दिवस कृती आराखड्याच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत नावीन्यपूर्ण व तंत्र स्नेही उपक्रम राबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
त्यानुसार मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातर्फे वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना बॉडीवॉर्न कॅमेरे देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.यात जवळपास दोनशे कॅमेरे खरेदी केले जाणार आहे. तर पहिल्या टप्प्यात २० कॅमेऱ्यांचे वाटप पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी अधिकारी व अमलदारांना केले आहे.
प्रामुख्याने बॉडीवॉर्न कॅमेरा हे उपकरण पोलिसांच्या वर्दीवर बसवले जात आहेत.यामुळे रस्त्यावर घडणारी प्रत्येक घटना यात सहजपणे रेकॉर्डिंग केली जाणार असून त्यामुळे कायद्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली जबाबदारी पार पाडण्यास मदत होणार असल्याचे पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी सांगितले आहे.
कॅमेऱ्याची विशेषतः काय?
बॉडीवॉर्न कॅमेऱ्याचे वाटप हे रस्त्यावर कर्तव्य पार पाडणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांना केले जाणार आहे. यात ऑडिओशिवाय व्हिडीओ रेकॉर्ड करण्याची सोय आहे. विद्युत चार्जिंग च्या मदतीने हे यंत्र काम करत असल्याने ते दररोज वापरणे शक्य होणार आहे.यात जवळपास ३० दिवस डेटा जमा करण्याची सोय असणार आहे. त्यामुळे एखाद्या प्रसंगी या कॅमेऱ्यामुळे पुरावे गोळा करण्यास पोलिसांना मोठी मदत मिळणार आहे.
नियंत्रण कक्षाची जोड
बॉडीवॉर्न कॅमेरे हे जीपीएस प्रणालीद्वारे विकसित करण्यात आले आहेत.त्यामुळे हे कॅमेरे थेट पोलीस नियंत्रण कक्षासोबत जोडण्यात आले आहे. यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांसोबत नियंत्रण कक्षाला परिस्थितीची लाईव्ह माहिती घेणे शक्य होणार आहे. याशिवाय ट्राफिक जंक्शन, महामार्ग आणि संवेदनशील घटनांना रेकॉर्ड करण्यासाठी या कॅमेऱ्यांची मोठी मदत होणार असल्याचा दावा पोलिसांकडून करण्यात आला आहे.