वसई -विरार महापालिकेच्या नवीन आयुक्तांचा निर्धार

विरार : वसई-विरार महानगर पालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी अनिलकुमार पवार यांनी गुरुवारी स्वीकारला. पहिल्याच दिवशी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत तिसऱ्या करोना लाटेसाठी सक्षम आरोग्य यंत्रणा उभारण्यावर  भर दिला जाईल, असे  सांगितले. यासाठी त्यांनी सर्व प्रभागांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली होती. तत्कालीन आयुक्त गंगाथरन यांच्या बदलीनंतर नवीन आयुक्त कोण येणार याची प्रतीक्षा गुरुवारी संपली. सिडकोत काम केलेले अप्पर जिल्हाधिकारी निवडश्रेणी अनिलकुमार पवार यांनी पहिल्याच दिवसापासून कामाला गती देत पदभार स्वीकारला. वसई-विरारमध्ये मागील काही दिवसापासून वाढते करोनाचे रुग्ण ही चिंतेची बाब असून त्यावर तत्काळ नियंत्रण मिळवणे आवश्यक असल्याने त्यांनी प्रथम आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यास प्राधान्य दिले आहे.

यासाठी आरोग्य आणि वैद्य्कीय विभागाची बैठक बोलावून त्याच्या करून सध्या कार्यरत असलेल्या आरोग्य यंत्रणाची माहिती घेतली.  यात त्यांनी सर्व रुग्णालयांचा आढावा घेतला. तसेच मागील लाटेत प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्याने यावेळी त्यात कोणतीही तुट राहणार नाही असा विश्वास त्यांनी दिला आहे. तिसरम्य़ा लाटेत रुग्णांना अधिक जलद आणि सोयीस्कर उपचार कसे देता येतील यावर भर दिला जाईल  तसेच रुग्ण संख्या वाढल्यास खासगी रुग्णालयात सुद्धा नागरिकांसाठी उपचाराची सोय केली जाईल,असेही ते म्हणाले. सध्या केवळ नागरिकांचे आरोग्य प्राथामिकतेने नंतर हळूहळू सर्व विषय मार्गी लावले जातील यासाठी पुढील काही दिवस सर्व प्रभागांचा आठवा घेण्याचे काम सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.