लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मालजीपाडा येथे एका मालवाहतूक वाहनाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. वास पुलाजवळ हा प्रकार घडला. दोन तासात अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर मिळविले. या लागलेल्या आगीमुळे महामार्गावर धुराचे वातावरण निर्माण होऊन वाहतूक सेवा विस्कळीत झाली.
वसई पूर्वेच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या महामार्गावर शनिवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या मालवाहतूक टेम्पोने पेट घेतला. आगीची तीव्रता अधिकच असल्याने आगीचे धुराचे लोळ हवेत उसळत आहेत. तर आजूबाजूच्या परिसरात धुराचे वातावरण पसरले आहे.
या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तातडीने वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले. एक ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग नियंत्रणात आली आहे.सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसून संपूर्ण वाहन जळून खाक झाले आहे. वाहनात झालेल्या तांत्रिक बिघाड झाल्याने शॉट सर्किट होऊन ही लागली असल्याचे सांगण्यात आले आहे.