भाईंदर :- भाजप नगरसेवक अरविंद शेट्टी यांच्यावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचे तीव्र पडसाद शहरात उमटले आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या दबावामुळे हे गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी गुरुवारी काशिमीरा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या आंदोलन केले. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप प्रत्यारोपाचे हे राजकारण चांगलेच रंगले आहे.
घोडबंदर येथे भाजप नगरसेवक आणि हॉटेल व्यावासयिक अरविंद शेट्टी यांचा आणि आमदार प्रताप सरनाईक यांचा वाद आहे. नुकताच शेट्टी यांनी सरनाईक यांच्यावर जाहीर आरोप केले होते. त्यामुळे शेट्टी यांनी रस्त्याचे काम रोखल्याचे कारण देत त्यांच्यावर सरनाईक यांनी काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे हा वाद चिघळला आणि माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी या वादात उडी घेतली. शेट्टीविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे हे राजकीय दबावापोटी व खोटे असल्याचे आरोप आता मिरा भाईंदर भाजप पक्षाने केले आहे. त्यामुळे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्या नेतृत्वात भाजप पक्षाने गुरुवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले.
हेही वाचा – खासदार भावना गवळी यांचे तिकीट कटणार? महायुतीकडून चंद्रकांत ठाकरे की राजू पाटील राजे!
हेही वाचा – कोल्हापूरच्या आखाड्यात निवडणुकीपूर्वीच खडाखडी सुरू
यावेळी पोलिसांवर कायदा व व्यवस्था टिकवण्याची जबाबदारी असतानादेखील सहाय्यक पोलीस अधिकारी योगेश काळे याने कंत्राटदाराला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचे आरोप मेहता यांनी केले. याशिवाय एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याने घटनेच्या दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात येऊन शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा खोटा गुन्हा त्यात दाखल केला. इतकेच नव्हे तर महापालिकेचा काही संबंध नसताना पालिकेने शेट्टीवर कारवाई करण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे कायद्याचा गैरवापर करून गुन्हा दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे.