सुहास बिर्‍हाडे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई- विरारच्या चिखलडोंगरी गावात मांगेला समाजात जातपंचायत पद्धत सुरू असल्याचा प्रकार ‘लोकसत्ता’ने उघडकीस आणला होता. या बातमीचे तीव्र पडसाद बुधवारी सर्वत्र उमटले. या प्रकरणात समाजाने बहिष्कृत केलेल्या एका महिलेच्या तक्रारीवरून जात पंचायतीच्या १७ जणांविरोधात अर्नाळा सागरी पोलिसांनी सामाजिक बहिष्कारापासून संरक्षण कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला आहे. अशा प्रकारचा जिल्ह्यातील हा पहिला गुन्हा आहे.

विरारच्या चिखलडोंगरी गावात आजही मांगेला समाजात जात पंचायत पद्धत सुरू आहे. या जातपंचायतीच्या विरोधात जाणार्‍यांना २५ हजार रुपयांचा दंड आकारला जातो तसेच त्यांना वाळीत टाकले जाते. या गावातील उमेश वैती (५०) यांच्यासह ६ जणांना नुकतेच जात पंचायतीने बहिष्कृत करून वाळीत टाकले होते. जात पंचायतीच्या दहशतीमुळे उमेश वैती गाव सोडून अज्ञात ठिकाणी निघून गेले आहेत. ते वृत्त ‘लोकसत्ता’ने बुधवार ८ नोव्हेंबरच्या अंकात प्रसिध्द केले होते. उमेश वैती हे अर्नाळा गावातील मंगला वैती यांच्या घरात लपल्याच्या संशयावरून गावगुंड मंगला यांच्या घरात शिरले आणि त्यांना दमदाटी केली.

आणखी वाचा-विरारजवळील चिखलडोंगरी गावात जातपंचायतीची दहशत; ६ ग्रामस्थांना बहिष्कृत करून प्रत्येकी २५ हजारांचा दंड

मंगला वैती यांच्या कुटुंबियांना देखील २०२१ मध्ये बहिष्कृत करून वाळीत टाकले आणि २५ हजार रुपयांचा दंड आकारला होते. त्यामुळे ते अर्नाळा गावात रहात आहेत. याप्रकरणी मंगला वैती (३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून अर्नाळा सागरी पोलिसांनी जात पंचायतीच्या १७ जणांविरोधात महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण, प्रतिबंध व निवारण अधिनियमाच्या कलम ५ आणि ६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

आम्ही या प्रकरणी आम्ही एक गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे अशी माहिती परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सुहास बावचे यांनी दिली. गावात सामाजिक सलोखा कायम राहील यासाठी जनजागृती केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अन्य प्रकणातील तक्ररादारांचे जबाब नोंदवून एकाच गुन्ह्याअंतर्गत तपास केला जाईल, असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक विठठल चौगुले यांनी सांगितले.