वसई- १२ वी वाणिज्य शाखेच्या उत्तरपत्रिका जळीत प्रकरणात संबंधित शिक्षिका आणि महाविद्यालयाच्या प्राचार्याविरोधात विरारच्या बोळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २५ फेब्रुवारी रोजी शिक्षिका प्रिया रॉड्रीक्स यांनी बेकायदेशीरपणे या उत्तरपत्रिका घरी तपासणीसाठी आणल्या होत्या. मात्र १० मार्च रोजी त्यांच्या घराला लागेलल्या आगीत यातील १७५ उत्तरपत्रिक जळून खाक झाल्या होत्या. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. अखेर  महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने तक्रार दिल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वाणिज्य शाखेच्या संघटन व व्यवस्थानप (ओसी) या विषयाच्या उत्तरपत्रिका परीरक्षक कार्यालय एम २७ यांच्या मार्फत विरारच्या उत्कर्ष विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मुग्धा लेले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या होत्या. त्यातील १७५ आणि १२५ उत्तरपत्रिकांचे गठ्ठे शाळेच्या शिक्षिका आणि परिक्षक नियामक प्रिया रॉड्रीक्स यांच्याकडे तपासण्यासाठी देण्यात आल्या होत्या. त्यांनी या उत्तरपत्रिका महाविद्यालयात तपासणे अपेक्षित होते.

परंतु त्यांनी २५ फेब्रुवारी रोजी या उत्तरपत्रिका नानभाट रोड येथील गॉडस विला या आपल्या बंगल्यात आणल्या होत्या. दरम्यान १० मार्च रोजी त्यांच्या घराला आग लागली आणि इतर साहित्या बरोबर १७५ उत्तरप्रतिका जळून खाक झाल्या होत्या. हे प्रकरण समोर येताच एकच खळबल उडाली होती. शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी चौकशीचे आदेश दिले होते.

महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या मुंबई विभागाच्या सचिव ज्योत्सना शिंदे-पवार यांनी याप्रकरणी बोळींज पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. पोलिसांनी संबंधित शिक्षिकेचा जबाब नोंदविला होता. प्राथमिक चौकशीत प्राचार्या मुग्धा लेले आणि शाळेच्या शिक्षिका (नियामक) प्रिया रॉड्रीक्स यांनी नियमांचा भंग करून उत्तरपत्रिका तपासणीसाठी घरी दिल्याचे आढळून आले. त्यानुसार या दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १९८, २२३ (अ), ३२४ (३) सह सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा १९८४ च्या कलम ३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना काळजीचे कारण नाही- शिक्षण मंत्री १२ वी वाणिज्य शाखेच्या ज्या १७५ उत्तरपत्रिका जळाल्या होत्या त्या तपासून त्यांचे गुणही देण्यात आलेले होते अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही, विद्यार्थ्यांनी काळजी करून नये असे त्यांनी सांगितले.