वसई :  केंद्र सरकारकडून मिठागरांच्या जमिनींचा लिलाव करण्याचे धोरण आखले जात असल्याने वसईतील मीठ उत्पादक हवालदिल झाले आहेत. वसईतील मीठ व्यवसायाला आधीच घरघर लागली आहे. आता मिठागरांचा लिलाव केला तर वसईतील मीठ उत्पादक भूमिपुत्र कायमचे उद्ध्वस्त होतीली, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वसई, विरार भागांतील मीठ उत्पादन हा पारंपारिक व्यवसाय आहे. वसईत वनराशी, आगरवती सलाम,  हिरागर, शेणखई, गुरुप्रसाद, जुना वचक, नवामुख अशी विविध प्रकारच्या २५ ते ३० मिठागरांचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून मिठागरांच्या उत्पादकांना विविध प्रकारच्या संकटांचा सामना करावा लागत आहे.

त्यामध्ये खाडय़ांचे झालेले दूषित पाणी यामुळे पाण्यातील खारटपणा हा कमी झाला आहे. तर दुसरीकडे कामगार कमतरता, उत्पादन खर्च,  बाजारमंदी, पूरस्थिती, अवेळी झालेला पाऊस अशा अनेक कारणांमुळे याचा मोठा परिणाम हा व्यवसायावर होत असल्याने हा व्यवसाय अडचणीत सापडू लागला आहे. अशी परिस्थिती असतानाही वसईतील काही मीठ उत्पादकांनी हा व्यवसाय सुरू ठेवला आहे. 

मात्र आता या मीठ पिकविण्यासाठी शासनाने दिलेल्या जागा या खासगी कंपन्यांना देण्यासाठी लिलाव करण्यासाठीचे धोरण आखले जात आहे. मुंबई आणि वसई, विरार परिसरांत साडेपाच हजार एकर जमीन ही मिठागराची आहे. वसईतील उमेळे रस्त्यालगत, राजावळी, जुचंद्र, वसई पूर्व अशा विविध ठिकाणी मीठ पिकविले जात आहे या जागा नामशेष होऊन येथील मूळ पारंपरिक व्यवसाय पूर्णत: उद्ध्वस्त होतील, अशी चिंता व्यक्त केली जात आहे.

सद्य:स्थितीत महाराष्ट्रात कमी प्रमाणात मीठ उत्पादन होत आहे. जर आहे ते मीठ उत्पादन करणे बंद झाले तर गुजरात या राज्यावर मिठासाठी अवलंबून राहावे लागण्याची शक्यता असल्याचे मीठ उत्पादक हेमंत घरत यांनी सांगितले आहे.

वसई, विरारमधील मिठागर व्यवसाय आधी हळूहळू उद्ध्वस्त होत आहे. या निर्णयामुळे आता त्यात अर्थातच आणखीन भर पडणार असल्याचे राज्य मीठ उत्पादक संघाचे अध्यक्ष मदन किणी यांनी सांगितले आहे.

पाणी प्रदूषणाचा परिणाम

मीठ तयार होण्याची खारट पाण्याची आवश्यकता असते. मात्र खाडय़ांमधील वाढते प्रदूषण यामुळे पाण्याचा खारटपणा टिकून राहिला नाही, त्यामुळे मीठ उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले डिग्री तयार होत नाही. याचा उत्पादनावर मोठा परिणाम होत आहे, तर दुसरीकडे आजच्या घडीला स्थानिक मजूर मिळत नसून पालघर, डहाणू अशा भागांतून मजूर आणावे लागत असल्याचे मीठ उत्पादकांनी सांगितले आहे.

वातावरणीय बदलाचा फटका

नियोजित वेळेत मीठ तयार होण्यासाठी चोपणे, पाणी जमा करणे, त्याची योग्य ती डिग्री तयार करणे अशा मीठ पिकविण्यासाठीच्या विविध प्रक्रिया पार पाडाव्या लागतात .गेल्या दोन ते तीन वर्षांपासून वातावरणात होणाऱ्या बदलामुळे अवेळी  कोसळत असलेल्या पावसाचा परिणाम हा मीठ उत्पादनावर झाला होता. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असलेली मिठागरे आता संकटात आहेत.

मीठ उत्पादन टिकवून ठेवण्यासाठी आजही काही उत्पादक प्रयत्न करीत आहेत. त्यातच आता मिठागराच्या जागांचा लिलाव झाला तर ही प्रक्रिया ठप्प होईल अशी चिंता आहे. 

– हेमंत घरत, मीठ उत्पादक, वसई

Story img Loader