वसई – सागरी किनार्‍याच्या सुरक्षेसाठी निघालेल्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या सायकल रॅलीचे वसईत भव्य स्वागत करण्यात आले. महामार्गावरील पेल्हार आणि मांडवी पोलिसांनी या रॅलीच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल (सीआयएसएफ) ने आपल्या ५६ व्या स्थापना दिवसानिमित्त ‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ या संकल्पनेवर ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉनचे आयोजन केले आहे. गुजराथ आणि पश्चिम बंगाल येथील दोन ठिकाणांहू ही सायकल रॅली निघाली आहे. ७ मार्च २०२५ गुजराथच्या कच्छ किनारपट्टीवरून निघालेल्या एका सायकल रॅलीचे वसईत भव्य स्वागत करण्यात आले.

रॅलीतील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांचे फुलांचा वर्षाव करून जल्लोषात स्वागत केले आहे. त्यांच्या स्वागतासाठी पेल्हार आणि मांडवी पोलिसांनी या रॅलीचे गोल्‍डन चॅरियट हॉटेल येथे एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी सायकलपटूंना सलामी दिली तर पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी  गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले.

यावेळी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, वसईचे प्रांतअधिकारी शेखर घाडगे, तहसिलदार अविनाश कोष्टी, पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी, मांडवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे उपस्थित होते.

सीआयएसएफच्या अधिकार्डयांनी ही ऐतिहासिक सायकल मोहीम असल्याचे सांगितले. यामुळे किनारपट्टी भागातील सुरक्षा आणि जागरूकता अधिक मजबूत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाच्या जवानांचा शारिरीक क्षमता आणि मानसिक खंबीरतेच कस लावणारी ही रॅली असल्याचे त्यांनी सांगितले.

अशी निघाली सायक्लोथॉन

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाची सायकल रॅली गुजरातमधील कच्छ येथील लक्षद्विप किल्ला आणि पूर्व किनारपट्टीवरील आणि पश्चिम बंगालमधील बक्खाली येथून दोन सायकल पथकांनी ही रॅली सुरू केली आहे. ९ राज्यातून किनारपट्टीवरील ६ हजार ५५३ किलोमीटरचा प्रवास करणार आहे. किनारपट्टी सुरक्षा, पर्यावरण रक्षण, भारताच्या आर्थिक समृद्धीचे रक्षण करण्याबाबत बांधिलकी दर्शवणे, स्थानिक मच्छीमार समुदायांना सागरी किनारा सुरक्षेबद्दल जागरूक करणे, त्यांना सुरक्षा यंत्रणांबरोबर जोडणे या उद्देशाने ही सायक्लॉनथॉन रॅली सुरू झाली आहे. 

या सायक्लोथॉनमध्ये १४ महिलांसह एकूण १२५ केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलाचे  कर्मचारी सहभागी झाले आहेत.सायकलस्वार भारताच्या किनारपट्टीच्या प्रदेशांमधून प्रवास करतील, ज्यामध्ये सूरत, मुंबई, गोवा, मंगळुरू, कोची, हल्दिया, कोणार्क, पारादीप, विशाखापट्टणम, चेन्नई, पुदुचेरी यांसारख्या शहरांचा समावेश आहे. दोन्ही पथके १ एप्रिल २०२५ रोजी तामिळनाडूमधील कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारक येथे एकत्र येऊन रॅलीचा समारोप करतील.