वसई : नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील सुप्रसिद्ध श्री चंडिका मातेच्या चैत्र यात्रोत्सवाला १५ एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. १५ ते १७ एप्रिल असा तीन दिवस हा चैत्र यात्रोत्सव चालणार असून निमित्ताने चंडिका देवी न्यासातर्फे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडणार आहेत.
नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथील डोंगरावर आई चंडिका मातेचे प्राचीन कालीन मंदिर आहे. या मातेच्या दर्शनासाठी ठाणे, मुंबई, भिवंडी, पालघर, वसई विरार यासह अनेक भागातून भाविक भक्त येतात. मागील काही वर्षांपूर्वी य मंदिराला जिल्हा नियोजन कडून तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने भाविक भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.
दरवर्षी प्रमाणे यंदाही आई चंडिका मातेचा यात्रोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जाणार आहे. यावर्षी १५ एप्रिलपासून हा यात्रोत्सव सुरू होत आहे. पहिल्या दिवशी अभिषेक सोहळा,१६ एप्रिल रोजी पालखी मिरवणूक सोहळा,१७ एप्रिल रोजी कुस्त्यांचे जंगी सामने असे कार्यक्रम होणार आहेत. न्यासा तर्फे यात्रोत्सवाच्या तयारीची सुरवात झाली असून रंगरंगोटी, विद्युत रोषणाई, मंडप डेकोरेशन, स्वच्छता , इतर सजावट सुरू आहे. तर रांगोळीप्रदर्शन , नाट्यप्रयोग याचे सादरीकरण करण्यासाठी कलाकारांची रेलचेल सुरू केली आहे.
दर्शनासाठी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी पिण्याचे पाणी, शीतपेय, तीर्थप्रसाद, पार्किंग व्यवस्था, शौचालय, व इतर सर्व प्राथमिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच कोणताही अनुचित प्रकार घडू नये नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त, वाहतूक पोलीस, वसई विरार महापालिका, यांची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती न्यासा तर्फे देण्यात आली आहे. नायगाव पोलिसांमार्फतही यात्रोत्सवाच्या दरम्यान वाहतूक कोंडी व इतर अनुचित प्रकार घडू नये यासाठी आढावा घेतला जात आहे.
नाट्य प्रयोगांची धम्माल
चंडिका मातेच्या यात्रोत्सवाच्या निमित्तानेश्री दत्त प्रासादिक बावनचाळ नाट्य मंडळ यांच्या तर्फे मागील १२० वर्षांपासून नाट्यप्रयोग सादर केले जात आहे. ही नाट्य प्रयोगाची परंपरा जोपासत यावर्षी ” शापित वाडा” व ‘ सुख नय जिवाला…त आग लाव इस्टेटीला… ‘ अशी धम्माल विनोदी नाट्य प्रयोग सादर केले जाणार आहेत.
कुस्त्यांचे आखाडे रंगणार
मागील १५० वर्षांपासून चंडिका देवीच्या यात्रेच्या निमित्ताने कुस्ती मंडळातर्फे जंगी कुस्त्यांचे सामने आयोजित केले जातात. यंदाही कुस्त्यांचे आखाडे रंगणार असून मुंबई, ठाणे, पालघर, वसई, भिवंडी, भाईंदर अशा विविध ठिकाणाहून कुस्ती पैलवान आखाड्यात उतरणार आहेत. यावर्षी एकूण १०० कुस्त्यांचे सामने खेळविले जाणार असून विजेत्यांना विविध प्रकारची पारितोषिके देऊन गौरविले जाणार आहे.