मागील काही वर्षांपासून वसई-विरार शहरात फोफावत असलेली अनधिकृत बांधकामे, बेकायदा माती भराव, पाणी जाण्याचे बंद करण्यात येत असलेले नैसर्गिक मार्ग, कॉंक्रीटीकरणाचे वाढते जंगल, नियोजनशून्य विकास प्रकल्प अशा विविध प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत अजूनही प्रशासन सावध नसल्याने दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून एक प्रकारे वसईकरांवर पूरसंकटच घोंघावत आहे.

शहराचा विकास साधत असताना पर्यावरणाचाही विचार होणे गरजेचे आहे. यात विशेषतः पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना अशी क्षेत्र सुद्धा टिकविण्याकडे पाठ फिरवली जाऊ लागली आहे. याचाच मोठा परिणाम सर्वत्र दिसून येऊ लागला आहे. त्यासोबतच अनिर्बंध माती भराव, कचऱ्याचे व्यवस्थापन नाही, सिमेंट काँक्रीटच्या जंगलामुळे पावसाचे पाणी मुरण्यासाठीच्या खुल्या जागा नाहीत, पाण्याचे स्रोतांचे जलसंधारण नाही. अशा पर्यावरण रक्षण व संवर्धन उपाय योजना होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल असा प्रश्न निर्माण झाला आहे मुंबई शहराला लागूनच वसई विरार शहर आहे. या शहराकडे नैसर्गिक सौंदर्य व पर्यटनाच्या दृष्टीने बघितले जाते. मात्र काही वर्षांपासून या शहराचा नियोजनबद्ध विकास होण्याऐवजी नियोजन शून्य विकास होऊ लागला आहे. याचाच परिणाम मागील काही वर्षांपासून वसईकर सहन करीत आहेत.

मागील पाच ते सहा वर्षांपासून शहरात पूरस्थितीची समस्या निर्माण होत आहे. या समस्येमुळे येथील जनजीवन विस्कळीत होऊन नागरिकांचे प्रचंड हाल होतात. तर दुसरीकडे मालमत्तेचे ही मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. या निर्माण होत असलेल्या समस्येवर तोडगा शोधण्याऐवजी उलट समस्या वाढविण्याचे काम शहरात सुरू आहे. पावसाळा आला की सर्वत्र आनंदाचे क्षण बरसू लागतात. मात्र वसईत जोरदार पाऊस सुरू होताच चिंता लागते ती म्हणजे पूरस्थितीची कारण कधी कोणता भाग पाण्याखाली जाईल सांगता येत नाही.

त्यातच आता बेकायदेशीर माती भराव करण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. अगदी शहराच्या मुख्य रस्त्यापासूनच ते सर्वत्र माती भराव टाकून जागा सपाटीकरण करवून घेतल्या आहे. मोकळ्या जागा ही आता मातीभरावाच्या विळख्यात सापडू लागल्या आहे. सुरवातीला ज्या जागेत पावसाचे पाणी साचून त्याचा निचरा होत होता असे मार्गच बंद झाले आहेत. त्यातील सर्व पाणी मुख्य रस्ते व नागरी वस्तीतच साचून राहत असल्याचे चित्र पहावयास मिळते. जे पाणी जाण्याचे तीस ते चाळीस फुटांचे नाले होते ते भराव टाकून ६ ते आठ फुटांवर आणले आहेत. तर काही ठिकाणी जलाशय, बावखले नष्टच केली आहेत.

यावर नियंत्रण मिळविण्यात प्रशासन सपशेल अपयशी ठरले असल्याचे चित्र दिसून येत आहे. तर दुसरीकडे माती भरावाच्या नावाखाली शहराच्या बाहेरील राडारोडा ( डेब्रिज) आणून टाकला जात आहे. बाहेरील येणारा राडारोडा नियंत्रण व्हावा यासाठी पालिकेकडून उपाययोजना होणे गरजेचे होते.त्यावरही अद्याप तोडगा निघालेला नाही. शहराच्या वेशीवर अशी वाहने रोखण्यासाठी वर्सोवा पुलाजवळ चौकी केली ती ही बंद आहे. मग शहरात पूरस्थिती व विद्रुपीकरण करण्यास कारणीभूत करणारा राडारोडा रोखणार कसा ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

याशिवाय पश्चिमेच्या भागात विस्तीर्ण असे समुद्र किनारे आहेत. मात्र किनार पट्टीच्या भागात वाळू माफियांनी धुमाकूळ घातला आहे. बेसुमार वाळू उपसा यामुळे किनार पट्टीवरील बहुतांश भाग उध्वस्त झाला असून समुद्राचे पाणी थेट किनाऱ्याच्या भागात येत आहे. लाटांच्या तडाखे रोखण्यासाठी भुईगाव, नवापूर, रानगाव, पाचूबंदर- लांगेबंदर अशा ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे तयार केले जाणार होते. निधी मंजूर होऊन दोन वर्षे झाली तरीही कामाला सुरवात झाली नाही. त्यामुळे किनाऱ्यावर लाटा जोरदार आदळून सुरुच्या बागा, शेती, व नागरिकांच्या घरांचे नुकसान होत आहे.

अशा अनेक समस्या शहरात आहेत.मात्र यावर नियंत्रण मिळविणे व उपाययोजना आखण्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.यावरूनच वसई विरार शहर बुडवायची पूर्व तयारी तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे. एखादी घटना घडल्या नंतर उपाययोजना करण्याऐवजी त्या घटना घडू नयेत यासाठी पूर्व नियोजन करणे हेच नागरिकांच्या हिताचे ठरेल.

कांदळवन उध्वस्त

वसई विरार मध्ये खाडी किनाऱ्याला लागून, पाणथळ जागेत मोठ्या प्रमाणात  कांदळवन क्षेत्र होते. या कांदळवनांमुळे किनाऱ्यावर  येत असलेला पाण्याचा प्रवाह रोखणे,जमिनीची होणारी धूप थांबविणे, सुनामी, चक्रीवादळ आणि पुरापासून संरक्षण करणे, समुद्राचे प्रदूषण कमी करणे, समुद्रातील मत्स्य प्रजातींची जैविक साखळी अबाधित ठेवणे यासाठी ही कांदळवने महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मात्र मागील काही वर्षांपासून भूमाफियांच्या मार्फत  कांदळवनांची कत्तल करून ती नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी त्यावर मोठ्या प्रमाणात माती भराव करून त्यावर चाळी बांधणे, बेकायदेशीर पार्किंग करणे, अतिक्रमण करून बांधकामे उभारली जात आहेत.

काँक्रिट जंगलाचा परिणाम

वाढत्या काँक्रीटीकरणामुळे भूजल पातळी कमी होऊ लागली आहे. दिवसेंदिवस भूगर्भातील पाण्याची पातळी घटत असल्याने हा चिंतेचा विषय ठरू शकते. मागील काही वर्षात वसई विरार हा झपाट्याने विकसित होणारा भाग आहे. या भागात रहिवासी इमारती, औद्योगिक क्षेत्र, विविध प्रकल्प तयार होत असल्याने मोठ्या प्रमाणात जमिनीवर कॉंक्रिटिकरण होऊ लागले आहे. विशेषतः आता रस्ते ही काँक्रिटचे केले जात आहे. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी जमिनीत न मुरता ते ही आता वरचे वर राहणार आहे. भूजल पातळी कमी होण्यासोबतच पूरस्थिती सारखी समस्या निर्माण होऊ शकते.