लोकसत्ता प्रतिनिधी 

वसई : नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथे आई चंडिका मातेचा चैत्र यात्रोत्सव बुधवारी मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. या यात्रोत्सवाच्या निमित्ताने लाखोंच्या संख्येने भाविक भक्तांनी मंदिरात हजेरी लावून चंडिका मातेचे दर्शन घेतले. 

नायगाव पूर्वेच्या जूचंद्र येथे डोंगरावर आई चंडिका मातेचे प्राचीन मंदिर आहे. या मंदिरात १५ ते १७ एप्रिल असा तीन दिवस चैत्र यात्रोत्सव पार पडला. यात्रोत्सवाच्या निमित्ताने श्री चंडिका देवी न्यासाच्या तर्फे जूचंद्र परिसरात भव्य पालखी मिरवणूक, महाआरती, कुस्त्यांचे जंगी सामने, नाट्यप्रयोग, रांगोळी प्रदर्शन असे विविध उपक्रम घेण्यात आले. वसई विरार सह मुंबई , ठाणे, पालघर, भिवंडी यासह इतर भागातील लाखो भाविक भक्तांनी या यात्रोत्सवाला भेट दिली.

यावेळी येणाऱ्या भाविक भक्तांसाठी तीर्थप्रसाद, शीतपेय, पिण्याचे पाणी, पार्किंग व्यवस्था, शौचालय अशा प्रकारच्या सोयी सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. तर दुसरीकडे मिठाई, लहान मुलांच्या खेळण्याची दुकाने, आकाश पाळणे, खाद्यपदार्थ, गृहउपयोगी वस्तू अशा विविध दुकानांनी  यात्रा फुलून गेली होती. या यात्रोत्सवामुळे लाखों रुपयांची उलाढाल झाली.

तसेच यात्रोत्सवयाच्या जूचंद्रच्या कलाकारांनी पर्यावरण संवर्धन यासह विविध ज्वलंत विषयावर भाष्य करणाऱ्या साकारलेल्या रांगोळ्या लक्षवेधी ठरल्या या प्रदर्शनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. श्री दत्त प्रासादिक  बावनचाळ नाट्य मंडळ जूचंद्र यांच्या तर्फे १२० वर्षांची नाट्यपरंपरा जोपासत यावर्षी ” शापित वाडा”  व ‘ सुख नय जिवाला…त आग लाव इस्टेटीला… ‘ अशी धम्माल विनोदी नाट्यप्रयोग कलाकारांनी सादर केले. या दोन्ही नाट्यप्रयोगांना रसिक प्रेक्षकांनी भर भरून दाद दिली.

आखाड्यात रंगले कुस्त्यांचे सामने 

यात्रेच्या निमित्ताने कुस्ती महामंडळातर्फे जंगी कुस्त्यांचे सामने ठेवण्यात आले होते. यात मुंबई, भाईंदर, भिवंडी,नाशिक,वसई विरार अशा विविध ठिकाणच्या कुस्ती पैलवानांनी उपस्थिती दर्शवली होती.यात शंभराहून अधिक कुस्ती पैलवान होते त्यात काही महिला कुस्ती पैलवानांचा समावेश होता. यात ७० कुस्त्यांच्या लढती पार पडल्या. यात विजेत्यांना रोख रक्कम व भेट वस्तू देऊन गौरविण्यात आले.या कुस्त्यांचे सामने पाहण्यासाठी प्रेक्षकांनी मोठी गर्दी केली होती. मागील दीडशे वर्षांपासून ही कुस्त्यांच्या आखाड्यांची परंपरा आहे ती जपण्याचा प्रयत्न आहे. यातून पैलवानांना प्रोत्साहन मिळेल असे कुस्ती महामंडळाचे केदारनाथ पाटील यांनी सांगितले.

पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

चंडिका देवीच्या यात्रोत्सवात मोठ्या संख्येने भाविक भक्त सहभागी होत असतात. यावेळी प्रचंड गर्दी होती. यात्रोउत्सवाच्या दरम्यान कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी नायगाव पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. तर अग्निशमन दल व पालिकेचे वैद्यकीय आरोग्य पथक ही तैनात ठेवण्यात आले होते.