वसई- मुंबई- अहमदबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अतिक्रमणांमुळे अपघातामध्ये वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे याबाबत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे आदेश राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्ग प्राधिकरणाला दिले आहेत. महामार्गाच्या दोन्ही बाजूस मोठय़ा प्रमाणावर अतिक्रमणे झाली असून नियम डावलून अनधिकृत बांधकामे झालेली आहेत

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई आणि गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग हा वसई विरार आणि पालघर जिल्ह्यातून जातो. या महामार्गालगत मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे झाली आहे. महामार्गाच्या दुतर्फा हॉटेल, टप-या, गॅरेज, ढाबे आदींनी अतिक्रमण केले आहे. महामार्गालगतचे नैसर्गिक नाले बुजवून अतिक्रमणे झाली आहेत. मुंबई अहमदाबाद महामार्ग प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मृत्यूचा महामार्ग बनत चालला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे नियम डावलून मोठय़ा प्रमाणात अनधिकृत हॉटेल, मॉल, औद्योगिक वसाहती, कारखाने, दुकाने यांनी आपल्या सोयीसाठी महामार्गावरील सुरक्षा कठडे तोडून मार्ग बनवत आहेत. यामुळे सुरक्षा कठडे नसल्याने अपघातांची संख्या वाढत चालली आहे. महामार्गावर २०२० . वर्षांत ५५५ अपघात झाले असून ३३१ नागरिकांचा मृत्यू झाला तर ३७१ नागरिक गंभीर जखमी झाले आहेत.

मुंबई अहमदाबाद महामार्ग हा प्रमुख राष्ट्रीय महामार्ग असून त्यावरून दररोज लाखो वाहने प्रवास करत असतात. राष्ट्रीय महामार्ग असल्याने यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होऊ नये असा नियम आहे. रस्त्याच्या बाजूने होणाऱ्या वसाहतीमुळे रस्त्यावरील वाहनांच्या वाहतुकीस अडथळे निर्माण होतात. त्याचप्रमाणे अशा वसाहतींमध्ये येणारी वाहने थांबल्यामुळे वाहतुकीस अडथळा येतो. यासाठी महामार्गावरील अतिक्रमण रोखण्यासाठी नियम तयार करण्यात आलेले आहेत. नगर विकास खात्याने २०१९ मध्ये तसा अध्यादेश काढला होता.

राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागापासून भागात ३७ मीटर पर्यंत कोणतेही इमारत बांधकाम करता येणार नाही. तर नागरी व औद्योगिक भागात रस्त्याच्या हद्दीपासून ३ ते ६ मीटर, तर हॉटेल, मॉल, व्यापारी गोडावून, मार्केट अशा अस्थापनासाठी ४५ मीटरची बंदी ठेवण्यात आली आहे. असे असतानाही अतिक्रमण करण्यात आलेले आहे.

महामार्गाला संरक्षक कठडे नसणे, महामार्गालगत बेकायदा दुकाने, ढाबे हॉटेल असणे ही अपघातांची कारणे होती. यासंदर्भात वसईतील माहिती अधिकार कार्यकर्ते विशाल राजेमहाडिक यांनी या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग आयोग, सार्वजनिक बांधकाम विभाग वसई, पालघर जिल्हाधिकारी आणि वसई विरार महानगर पालिका याच्याकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत एक महिन्याच्या आत वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा असे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अवर सचिव स्मिता मुकदम यांनी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाला दिले आहेत.

३०० हून अधिक बेकायदा बांधकामे
बांधकामांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर सुरक्षा कठडे बांधण्यात आले आले होते. पण विरार ते घोडबंदर या दरम्यान बेकायदा हॉटेल, गोडावून, दुकाने यांनी आपल्या सोयीसाठी हे कठडे तोडून रस्ते बनविले आहेत. यामुळे वाहनांचे अपघात वाढले आहेत. पण या अतिक्रमांवर आजतागायत कोणतीही कारवाई केली जात नाही. विरार ते घोडबंदर दरम्यान जवळपास ३०० हून अधिक बेकायदेशीर हॉटेल, गोडावून आणि इतर दुकाने आहेत या सर्व हॉटेलवाल्यांनी रस्त्यावरील सुरक्षा कठडे तोडून आपले मार्ग तयार करण्यात आलेत आहेत. यामुळे हा महामार्ग अधिक धोक्याचा बनला आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Check on encroachments government order to highway authority to submit report amy