वसई : वसई सुरुची बाग येथील शासकीय खाजण जागेवरील तिवरांची झाडे नष्ट करण्यासाठी रासायनिक द्रव्य टाकल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला होता. या प्रकरणी वसईच्या मंडळ अधिकाऱ्यानीं पंचनामे करून वस्तुस्थितीचा स्थळ पाहणी अहवाल सादर केला आहे. या अहवालात तिवरांची झाडे विषारी द्रव्ये टाकून नष्ट केल्याचे नमूद करण्यात आले आहे. येथील कांदळवने नष्ट करून जागा हडप करण्याचा भूमाफियांचा डाव असल्याचे आरोप स्थानिकांनी केला आहे.

वसई पश्चिमेच्या सुरूची बाग समुद्र किनार्‍यागत मोठे कांदळवन आहे. तेथे तिवरांची झाडे आहेत. या जागेवर भूमाफियांचा डोळा आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील तिवरांची झाडे कोमेजून पडल्याचे आढळून आले. स्थानिकांनी पाहणी केली असता येथील नाल्यात विषारी रसायन टाकल्याचे दिसून आले होते. या रसायनांमुळेच ही तिवरांची झाडे नष्ट झाल्याचा स्थानिकांनी आरोप होता. अशा प्रकारे रसायन टाकून तिवरांची झाडे नष्ट करणार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली होती. वसईचे प्रांताधिकारी शेखऱ घाडगे यांनी या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार वसई मंडळ अधिकारी सुनील राठोड आणि तलाठी निवृत्ती बांगर यांनी सुरूची बागेला भेट देऊन पाहणी केली. कोमेजून पडलेल्या तिवरांच्या झाडांची पाहणी करून छायाचित्रे गोळा केली. या प्रकरणाचा वस्तुस्थितीचा स्थळ पाहणी अहवाल तहसीलदार वसई यांना सादर केला आहे. या अहवालानुसार प्रत्यक्ष पाहणीत या नैसर्गिक नाल्यात रासायनिक पदार्थ टाकल्याचे नमूद करण्यात आले आहे. याप्रकणी तहसिलदारांकडून आता पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे. नेमकी कुणी ही झाडे नष्ट केली ते आता उघड होणार आहे.

एम. जी. परुळेकर स्कूल समोर शासकीय खाजण जागेत कांदळवन आहे.२०१२ पासून कांदळवन नष्ट करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता भूमाफीयांनी रासायनिक पदार्थांचा वापर करून येथील मोठी कांदळवनाची झाडे नष्ट करण्यास सुरुवात केली असे स्थानिकांनी सांगितले. वसईत तीनशे हेक्टर कांदळवन क्षेत्र असल्याची माहिती कांदळवन संवर्धन समिती, वसई मार्फत देण्यात आली. मात्र, यातील बहुतांश क्षेत्र नष्ट करण्यात आले आहे. या बाधित क्षेत्राची माहिती शासकीय दप्तरी उपलब्ध नाही. त्यामुळे शासनाच्या परिपत्रकानुसार तीवरांची झाडे जतन, संवर्धन तसेच संरक्षण करण्यासाठी तालुकास्तरावर गठीत करण्यात आलेली कांदळवन संवर्धन समितीच्या कामकाजावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

सुरूची बाग उध्दवस्त होण्याचा धोका..

वसई पश्चिमेला निसर्गरम्य सुरूची बाग समुद्रकिनारा आहे. येथे असलेली सुरूच्या झाडांमुळे या परिसराला सुरूची बाग समुद्रकिनारा असे नाव देणअयात आले आहे. मात्र गेल्या काही वर्षाेपासून येथील सुरूची झाडे कापण्यात येत आहे. त्यामुळे बाग ओसाड होऊ लागली आहे. येथील कांदळवनाचा तिवरांची झाडे आहे. तिवरांची झाडे नैसर्गिक धूप प्रतिबंधकाचे काम करतात. विविध पक्ष्यांचे निवासस्थान, जलचर प्राण्यांचे प्रजननस्थान आहे. परंतु आता सुरूच्या झाडांपाठोपाठ तिवरांची झाडे नष्ट केली जात असल्याने ही सुरूची बाग उध्दवस्त होण्याचा धोका निर्माण झाला आहे.