वसई पूर्वेतील चिंचोटी- कामण रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, असे आदेश खासदार राजेंद्र गावित यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत. वसई पूर्वेला चिंचोटी ते नागले परिसरातून चिंचोटी भिवंडी मार्ग जातो. या रस्त्याची देखभाल दुरुस्ती होत नसल्याने येथे प्रचंड खड्डे पडले होते. जणू काही या रस्त्यावर खड्डयाचे साम्राज्य तयार झाले होते. या खड्डय़ांमुळे आजवर अनेक अपघात घडले आहेत, नागरिकांच्या जीवावर बेतले आहेत. मात्र नागरिकांच्या सततच्या तक्रारीनंतरही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि देखभालीसाठी नेमलेली ठेकेदार कंपनी त्याकडे दुर्लक्ष करत होती.
याबाबत खासदार गावित यांनी चिंचोटी कामण रस्त्याच्या संबधित अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते दिनेश म्हात्रे यांसह मागील आठवडय़ात रस्त्याचा पाहणी दौरा केला. त्यावेळी रस्त्याची दुर्दशा पाहून त्यांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांना दिलासा देत तातडीने रस्ता दुरुस्तीचे आदेश सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले.खासदार गावीत यांच्या आदेशानंतर आता येथे डांबरीकरणाचे काम सुरू झाले, मात्र नागरिकांच्या मागणीवरून येथे काँक्रीटीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.
त्यासाठी सदरचा रस्ता एमएमआरडीएकडे वर्ग करून रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे खासदार गावित यांनी सांगितले.
डांबरीकरण निकृष्ट दर्जाचे चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याच्या डांबरीकरणाचे पॅचवर्कचे काम सुरू केले होते. मात्र ती केवळ वरवरची मलमपट्टी असून काही दिवसांतच पुन्हा रस्त्याची अवस्था पूर्वीसारखी होईल, अशी भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.