लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : चिंचोटी कामण- भिवंडी रस्त्याच्या दूरवस्थेमुळे येथून प्रवाशांना खडतर प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तातडीने मार्गी लावण्यात यावे अशा सूचना बुधवारी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वसई पूर्वेच्या भागातून चिंचोटी कामण ते भिवंडी असा २२ किलोमीटरचा राज्य मार्ग गेला आहे. ठाणे भिवंडी यासह अन्य विविध भागांना जोडणारा हा महत्वाचा महामार्ग आहे. विशेषतः मालवाहतूकिच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा समजला जातो.हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग भिवंडी यांच्या अखत्यारीत येत असून सुरवातीला या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीचे काम सुप्रीम कंपनीकडे सोपविण्यात आले होते.  मात्र त्यांनी केवळ टोल वसूल करण्यापलीकडे कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना न केल्याने रस्त्याची दुर्दशा झाली आहे.

मागील काही वर्षांपासून या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.  जागोजागी पडलेले मोठं मोठे खड्डे त्यातून करावा लागणारा धोकादायक प्रवास यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांचा या रस्त्यावर अपघात होऊन मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. सातत्याने अशा घटना समोर येत असल्याने या भागातील नागरिकांनी रास्ता रोको, टोल बंद आंदोलन अशी विविध आंदोलने केली होती. याशिवाय नुकताच वसई विधानसभेच्या आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही या रस्त्याच्या समस्येबाबत आवाज उठविला होता.

बुधवारी या रस्त्याच्या संदर्भात राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आमदार स्नेहा दुबे-पंडित व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांची मंत्रालयात बैठक पार पडली. यावेळी चिंचोटी कामण भिवंडी रस्त्याची दुरवस्था व निर्माण होणारी समस्या यावर चर्चा झाली. यावेळी या रस्त्यामुळे येथील नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याचे आमदार स्नेहा दुबे- पंडित यांनी निदर्शनास आणून दिले. जरी आता रस्त्याचे कॉंक्रिटिकरण सुरू असले तरीही जे काम रखडले आहे ते ही लवकर मार्गी लावण्यात यावे अशा सूचना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी रस्त्या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षांपासून दुरूस्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या रस्त्याचे काम मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

दुरावस्थेचा उद्योगांनाही फटका

कामण चिंचोटी – भिवंडी  महामार्गालगत मागील काही वर्षांपासून औद्योगिक क्षेत्र विस्तारले आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने मालवाहतूक वाहने सुद्धा याच मार्गावरून ये जा करतात. पडलेल्या खड्ड्यांचा फटका उद्योग कारखान्यांना बसू लागला आहे. त्यांच्या कारखान्यातील मालाची वाहतूक ही खड्ड्यामुळे व्यवस्थित होत नसल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे. त्यामुळे अनेक उद्योग स्थलांतर करण्याच्या मार्गावर आहेत. त्याचा परिणाम येथील स्थानिक रोजगारावर होण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पाणी जाण्याचे मार्ग बंद झाल्याने पूरस्थितीची समस्या

चिंचोटी कामण – भिवंडी रस्त्याच्या लगत माती भराव झाले आहेत. काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे, अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे पावसाचे पडणारे पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद झाले आहेत. त्यामुळे दरवर्षी पावसाळ्यात विविध ठिकाणी पाणी साचून वाहतूक सेवा विस्कळीत होत असते.