वसई : पोलीस ठाण्यात अनेकदा नागरिकांना बरे वाईट अनुभव येत असतात. अनेकदा सामान्य नागरिकांच्या तक्रारींची त्वरित दखल घेतली जात नाही. हा अनुभव आता थेट वरिष्ठांपर्यंत थेट पोहोचवता येणार आहे. यासाठी आयुक्तालयाती प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘क्यूआर कोड’ लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या क्यूआर कोड द्वारे सर्वसामान्य नागरिक पोलीस ठाण्यात आलेला अनुभव, तक्रारी आणि सूचना वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकणार आहेत.

सर्वसामान्य नागरिक विविध तक्रारी घेऊन पोलीस ठाण्यात जात असतात. मात्र त्यांना पोलीस ठाण्याचा चांगला अनुभव येत नाही. अनेकदा पोलीस कर्मचारी उर्मटपणे वागतात आणि लहान सहान कामाला वारंवार चकरा माराव्या लागतात. त्यामुळे पोलिसांबाबत सर्वसामान्य नागरिकांच्या मनात गैरसमज निर्माण होऊन पोलीस दलाची प्रतिमा मलीन होत असते. यासाठी पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी नागरिकांची पोलीस ठाण्यात आलेल्या अनुभव जाणून घेण्याचे ठरवले. त्यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाण्यात क्यूआर कोड उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

या क्यूआर कोडद्वारे पोलीस ठाण्यास भेट देणाऱे नागरिकांना संबंधित पोलीस ठाण्याचे मुल्यांकन करून त्यांना आलेल्या अनुभव अभिप्राय तात्काळ अभिप्राय नोंदविता येणार आहे. याशिवा काही बदल किंवा सूचनाही करता येणार आहेत. त्यामुळे पोलीस- नागरिक यांच्यातील संवाद इथून पुढे अधिक प्रभावी होणार आहे, असा विश्वास पोलीस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. अशी सुविधा अनेकदा खाजगी कार्यलयात असते जिथे नागरिकांना आपला अनुभव नोंदविता येतो मात्र आता पोलीस ठाण्यात हा उपक्रम सुरु झाल्याने नागरिकांना आपले अनुभव सुलभपणे नोंदविता येणार आहेत. त्याच पोलीस ठाण्यात क्यूआर कोडच्या माध्यमातून नोंदविता येणार आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आयुक्तालयाच्या ‘संवाद सभागृह’ येथे पोलीस आयुक्त मधुकर पांण्डेय यांच्या उपस्थितीत पार पडला.

कसा नोंदवाल आपला अनुभव ?

या उपक्रमांतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्याच्या दर्शनी भागात क्यूआर कोड बेस स्टँडी (फलक) ठेवला जाणार आहे. हा क्यूआर कोड मोबाईलमध्ये असणाऱ्या स्कॅनरच्या मदतीने स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर एक प्रश्नावली येईल. ज्यात नागरिकांना आपले नाव आणि संपर्क क्रमांक नोंदविल्यानंतर पोलीस ठाण्यात काय काम होते ? कोणते अधिकारी भेटले ? त्यांनी केलेलं सहकार्य, काम पूर्ण झाले का? पोलीस ठाण्यातील स्वच्छता अशा प्रकारच्या प्रश्नांच्या माध्यमातून तात्काळ आपला अनुभव नोंदविता येणार आहे. एक नागरिक वारंवार पोलीस ठाण्यात का गेला आहे, त्याचं काम का झालं नाही याचं उत्तर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांना द्यावे लागणार आहे.