विरार : पहिल्याच मुसळधार पावसात शहरात महापालिकेकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ातून गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. पावसामुळे शहरातील विविध परिसरात गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. तर पालिकेने शहरात गढूळ पाण्याच्या पुरवठा होत नसल्याचे नसल्याचा दावा केला आहे. कारण पालिकेने काही दिवसांपूर्वीच पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम करून घेतले तसेच शहरातील साठवणुकीचे जलकुंभ सुद्धा साफ करून घेतले असल्याचे सांगितले. असे असतानाही शहरातील काही भागात गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे.
सध्या पावसाच्या सुरुवातीलाच पालिकेकडून येणारे पाणी गढूळ आणि अस्वच्छ असल्याने नागरिकांना साथीच्या आजारांची भीती बळकावत आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरु झाल्याने गढूळ पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणाची शक्यता वाढली आहे. पालिकेने जलकुंभ आणि शुद्धीकरण केंद्राचे काम केले असले तरी शहरात पसरलेल्या जलवाहिन्या ह्य जुन्या आणि जर्जर झाल्या आहेत. त्यात सातत्याने गळती होण्याचे प्रमाण दिसून येते त्याच बरोबर अनेक ठिकाणी जलवाहिन्या ह्य गटाराच्या बाजूने जात आहेत. सध्या पावसामुळे अनेक ठिकाणी नाले तुडुंब भरून वाहत आहेत. त्यामुळे या नाल्याचे पाणी या जलवाहिन्यात गळती असल्यास त्यात पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्या शहरातील विरार मनवेलपाडा, कारगिल नगर, आर जे नगर, नालासोपारा संतोष भुवन, हनुमान नगर, ओस्वाल नगरी, महेश नगर परिसरात पाणी गढूळ येण्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. नालासोपारा येथील पूर्व ओसवाल नागरी येथील रहिवाशी संदीप परडीकर यांनी सांगितले की, मागील तीन दिवसांपासून सतत महापालिकेकडून गढूळ आणि अस्वच्छ पाण्याचा पुरवठा होत आहे. या संदर्भात त्यांनी महापालिका पाणी पुरवठा विभागाला माहिती दिली तरी अद्यपही तसाच पाणीपुरवठा होत आहे.
विरार येथील कारगिल नगर परिसरात राहणारम्य़ा स्थानिकांना आधीच एक दिवसा आड पाणी येते. आणि त्यातही अशाप्रकारे गढूळ पाणी येत असल्याने नागरिकांनी सांगितले आहे. कारगिल नगर परिसरात मोठय़ा प्रमाणात चाळीच्या वस्ती आहेत. या वस्तीत नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी महापालिकेच्या पाण्यावरच अवलंबून राहावे लागते. त्यातही केवळ १ ते दीड तास पाणीपुरवठा केला जातो. या संदर्भात रहिवास्यांनी स्थानिक प्रतिनिधींना तक्रार केली आहे. पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने माहिती दिली की, सध्या पालिकेला ज्या जलस्त्रोतातून पाणीपुरवठा केला जातो. त्या ठिकाणी गाळाचे प्रमाण कमी आहे. तसेच पाऊस सुद्धा कमी पडला आहे. आणि पालिकेने शहरातील पाणी साठवणुकीसाठीचे जलकुंभ साफ करून घेतले आहेत. यामुळे शहरात गढूळ पाणी येणे शक्य नाही. तरी ज्या भागातून तक्रारी प्राप्त होतील तिथे पाहणी करून योग्य ती दखल घेतली जाईल.