उन्हाची तीव्रता अधिक वाढली असतानाच वसई पूर्वेच्या भागात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्याने संतप्त झालेल्या बुधवारी नागरिकांनी पालिकेच्या प्रभाग समिती जी कार्यालयावर मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले. वसई विरार शहरात पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून सुर्या प्रकल्प, पेल्हार, उसगाव, एमएमआरडीए अमृत योजना अशा विविध योजनेतून प्रतिदिन ३७० दशलक्ष लीटर पाणी उपलब्ध होत असले तरी पालिकेच्या कार्यक्षेत्रात असलेल्या ग्रामीण भागात अजूनही पाणी पोहचले नसल्याने पाण्यासाठी या नागरिकांना संघर्ष करावा लागत आहे. यात विशेषतः प्रभाग समिती जी  अंतर्गत येणाऱ्या कामण, देवदळ, कोल्ही, चिंचोटी, सातिवाली, गिदराई पाडा या भागात अधिकच पाणी टंचाई जाणवत आहे. पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा यासाठी शासनाने योजना राबविल्या मात्र त्या कार्यान्वित न झाल्याने आज या भागात पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे.

मुबलक पाणी मिळावे सातत्याने पालिके कडे पत्रव्यवहार सुरू आहे. मात्र दरवर्षी प्रमाणे पालिका आश्वासन देऊन दिशाभूल करीत असल्याने बुधवारी संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी माजी नगरसेविका प्रीती म्हात्रे व सामाजिक कार्यकर्ते यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती जी कार्यालयावर हंडा मोर्चा काढत आंदोलन केले.आज कर भरूनही नागरिकांना पाणी दिले जात नाही.पाण्यासाठी येथील नागरिकांना विहिरी, बोअरवेल , तलाव यांचा आधार घ्यावा लागत आहे. तर काही ठिकाणी नागरिकांना पाण्यासाठी दूरच्या अंतरावर जावे लागत आहे. तर काही ठिकाणी खड्डे मारून त्यात गोळा होणारे पाणी यावर तहान भागवावी लागत असल्याचे आंदोलन कर्त्यांनी सांगितले आहे.

एकीकडे नवीन तयार होणाऱ्या बांधकामे अशा ठिकाणी पाणी दिले जाते मात्र वर्षानुवर्षे पाण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांना पाणी दिले जात नसल्याचे नागरिकांनी सांगितले आहे. यावेळी आंदोलन कर्त्यांनी पालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निदर्शने केली आहे. यात ग्रामीण भागातील शेकडो महिलांचा सहभाग होता. जो पर्यंत पाण्याचे निराकारण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा आंदोलकांनी घेतला होता.

पाणी देण्याचे आश्वासन

पाण्याच्या संदर्भात आंदोलकांच्या आक्रमक पवित्रा लक्षात घेता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन कर्त्यांच्या शिष्टमंडळाला चर्चेला बोलावले होते. यात अमृत १ अंतर्गत वसई फाटा ते राजीवली पर्यंत ९०० मी.मी. व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू आहे. ही वाहिनी सुरू झाल्यानंतर २८ एप्रिल २०२५ पर्यंत स्टँड पोस्ट द्वारे पाणी पुरवठा केला जाईल. २७ ठिकाणी बोअरवेल मारण्याच्या सूचना, टँकरद्वारे पाणी पुरवठा, कामण येथील लघुपाट बंधारे योजना, दलित वस्ती योजना या दोन्ही योजनांची पाहणी करून योजना कार्यान्वित केल्या जातील असे आश्वासन पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले आहे.

२८ एप्रिल पर्यंत सूर्याचे पाणी न आल्यास आंदोलन

पालिकेने कामण परीसरातील नागरिकांना सुर्या योजनेतून २८ एप्रिल पर्यंत स्टँड पोस्ट द्वारे पाणी देण्याचे आश्वासन दिले आहे.  यापूर्वी सुद्धा आश्वासने दिली होती. जर पाणी आले नाही तर आता जे आंदोलन केले त्याही पेक्षा तीव्र आंदोलन केले जाईल असे आंदोलन कर्ते दिनेश म्हात्रे यांनी सांगितले आहे.