कल्पेश भोईर
वसई-विरार शहराला विविध प्रकारच्या भस्मासुरांनी पोखरायला सुरुवात केली आहे. अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफियांनी जमिनी हडप करून शहराची रचना बिघडवली आहे. तर दुसरीकडे वाळू माफिया बेसुमार वाळू उत्खनन करून किनारपट्टी उद्ध्वस्त करत आहेत. यामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून त्याची मोठी किंमत भविष्यात चुकवावी लागणार आहे. वसईचा परिसर हा विविध प्रकारच्या निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. पश्चिमेकडील अथांग पसरलेला निळाशार समुद्र, पूर्वेकडील विस्तीर्ण खाडय़ा या सौंदर्यात भर टाकत असतात. मात्र मागील काही वर्षांपासून या विविध खाडय़ा आणि नदीच्या पात्रातून मोठय़ा प्रमाणात वाळू उपसा केला जात असल्याने एक प्रकारे वाताहत होऊ लागली आहे. विशेषत: बेकायदेशीर मार्गाने वाळू उपसा करण्याचे प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. या प्रकाराकडे महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्यातर्फे कारवाईसाठी केली जाणारी टाळाटाळ यामुळे वाळू माफिया अधिक सक्रिय होऊन छुप्या मार्गाने वाळू उपसा सुरूच राहिला आहे.
वसई तालुक्यातील अर्नाळा, भुईगाव, पाचूबंदर, नायगाव, खानिवडे, तानसा-वैतरणा यांसह विविध ठिकाणच्या भागात वाळू उपसा होत असतो. वाळू ही समुद्र व नदी पात्र याची शोभा वाढविण्यासोबतच आजूबाजूच्या परिसरातील पर्यावरणाचे संवर्धन करण्यासही मदत होते. मागील काही वर्षांत वाढते शहरीकरण व विविध ठिकाणच्या भागांत बांधकामांना आलेला वेग यामुळे वाळूची मागणी अधिक वाढू लागली आहे. या वाढत्या मागणीमुळे त्यामुळे यातील अर्थकारणही वाढले आहे. त्यामुळे वाळू उपसाही वाढला आहे. बेसुमार आणि बेकायदा वाळू उपशामुळे खाडी व नदी पात्रातील वाळू संपुष्टात येत आहे. समुद्रात सातत्याने होणाऱ्या बेकायदा रेती उपसा यामुळे येथील किनारपट्टीच्या भागाला मोठा फटका बसू लागला आहे. विशेषत: या भागात रात्रीच्या सुमारास छुप्या मार्गाने वाळू उपसा करून मुंबई व इतर ठिकाणच्या भागांत वाहतूक केली जाऊ लागली आहे. पाचूबंदर या खाडी किनारपट्टीच्या भागात होत असलेल्या वाळू उपशामुळे त्याचा फटका हा किनारपट्टीच्या भागात राहत असलेल्या नागरिकांच्या घरांना बसू लागला आहे. तसेच या वाळू
घराखालील जमिनीची धूप होऊ लागल्याने घरांचा पायाही कमकुवत होऊन धोका निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे वाळू माफियांनी समुद्र किनाऱ्यालगतच्या भागात वाळू उपसा करण्यास सुरुवात केली आहे. विरार पश्चिमेतील अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता सर्रास वाळूचे उत्खनन केले जात आहे. दररोज येथून मोठय़ा प्रमाणात वाळूचा उपसा होत असून वाळू गोण्यात भरून विकली जाते. अगदी अर्नाळा पोलीस ठाण्याच्या जवळच वाळू उपशाचा प्रकार सुरू असताना याची पोलिसांनाही माहीती नाही का? आणि जरी माहीत झाले तरी कारवाईसाठी टाळाटाळ का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. तर महसूल विभागाचे अधिकारी कारवाईसाठी जातात तेव्हा त्यांना वाळू माफिया सापडत नसल्याचे सांगितले जाते.
शासकीय यंत्रणाच अशा प्रकारच्या वाळू उपशाला पाठिंबा देत असतील तर मग बेसुमार वाळू उपशाचे प्रकार रोखणार कसे? तसेच पर्यटनासाठी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या वसईतील किनारपट्टीच्या बहुतांश भागांत बेसुमार वाळू उपसा केला जात असल्याने किनाऱ्यावरील बहुतेक वाळूही समुद्रात खेचली जात आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील भागात खोली निर्माण होत आहे. यामुळे किनाऱ्यालगतचा भाग हळूहळू खचू लागला आहे. याचा मोठा फटका किनाऱ्यांना बसू लागला असल्याने पर्यटन धोक्यात आले आहे. या प्रकारांमुळे समुद्रात पर्यटक बुडण्याच्या घटनाही घडत असतात. नदी पात्राच्या भागातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. वसईच्या भागात असलेल्या तानसा नदी पात्रातही वाळू उपसा अधिक प्रमाणात झाल्याने किनाऱ्यालगतचा भागही खचून गेला आहे. त्यामुळे उसगाव भाताने या ठिकाणी जाणारा रस्ताही यात खचून गेल्याचे चित्र दिसून येत आहे.
वाळू उपशामुळे नदीपात्रातील बांधकामेही धोक्यात येत आहेत. अनेक ठिकाणी पुलांचे बांधकाम हे नदी व खाडी पात्रात खांब उभारून करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यालाही या अनिर्बंध वाळू उपशाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अतिप्रमाणात वाळू उपसा होत असल्याने अशा प्रकारच्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यावर महसूल विभाग व पोलीस यांचा कोणताही अंकुश नसल्याने सर्रासपणे वाळू उपसा सुरू राहिला आहे. तर काही वेळा महसूल व पोलीस यांच्या मार्फत कारवाई करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्यातही महसूल विभाग व पोलीस प्रशासन यांच्यातच समन्वय साधला जात नाही. एकीकडे पोलीस व दुसरीकडे महसूल विभाग यांना एकमेकांचे सहकार्य मिळत नसल्याची ओरड होऊ लागली आहे. या समन्वयाच्या अभावामुळे बेसुमार वाळू उपसा नियंत्रित कसा करणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सक्शन यंत्रामुळे डुबीचा व्यवसाय बुडाला
वाळू व्यवसाय सुरुवातीला वसईच्या भागातील स्थानिकांचा पारंपरिक व्यवसाय होता. त्यामुळे काही वर्षांपूर्वी विविध ठिकाणी मोठय़ा प्रमाणात वाळूचे पडाव होते आणि त्या वेळी फक्त पाण्यात डुबी मारून वाळू बाहेर काढली जात होती. मात्र हळूहळू याची जागा सक्शन यंत्राने घेतली आणि या व्यवसायाचे चित्रच बदलून गेले. त्यामुळे डुब्या पद्धतीने वाळू काढणाऱ्या मजुरांचा हातचा रोजगार गेला. तर काहींना आपले पडाव विकण्याची वेळ आली. यंत्राद्वारे वेगाने वाळू बाहेर येऊ लागल्याने समुद्राचाही ऱ्हास होऊ लागला आणि पर्यावरणाच्या प्रश्नामुळे सरकारी यंत्रणांनी निर्बंध लावले ते आताही कायम आहेत. यामुळे छुप्या मार्गाने वाळूचे उत्खनन करण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच प्रशासनाने योग्य ती पावले उचलली असती तर नियमानुसार वाळू उत्खनन सुरू राहिले असते आणि रोजगारही सुस्थितीत राहिले असते आणि पर्यावरणसौंदर्यही अबाधित राहिले असते.