पोलीस आणि महापालिकेचे दुर्लक्ष, करोना संसर्गाची भीती

विरार : वसई-विरारमध्ये एकीकडे करोना रुग्ण वाढत असताना महापालिका जत्रा आणि आठवडे बाजारांना परवानग्या देऊन करोना संसर्गाला आमंत्रण देत आहे. सध्या सणाचे दिवस सुरू असल्याने सर्वत्र जत्रा सुरू आहेत.  यात मनाई आदेश असतानाही मध्यरात्रीपर्यंत या जत्रा गर्दीने फुलून जात आहेत. या जत्रांवर पोलिसांचे आणि पालिकेचे अर्थपूर्ण दुर्लक्ष असल्याचा आरोप केला जात आहे. डिसेंबर महिन्यात शहरातील करोना रुग्णाची संख्या झपाटय़ाने वाढताना दिसत आहे. यामुळे गर्दी रोखण्यासाठी पोलीस प्रशासन आणि वसई विरार महानगर पालिकेने शहरात रात्री ९ ते सकाळी ६ पर्यंत मनाई आदेश लागू केले आहेत. त्यानुसार रात्री ९ नंतर कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी नाही. असे असतानासुद्धा विरार,  आर जे नगर, नालासोपारा चंदन नाका, वसई सनसिटी परिसरात मोठय़ा जत्रा भरविल्या जात आहेत. विशेष म्हणजे महानगरपालिका परवाने विभागाने त्यांना तात्पुरते परवाने दिल्याची माहिती हाती आली आहे. एकीकडे पालिकेने सार्वजनिक कार्यक्रमांवर बंदी आणली आहे. त्यात ठरावीक आणि लशीच्या दोनही मात्रा पूर्ण करणे बंधनकारक केले आहे. नुकतेच पालिकेच्या प्रभाग समिती सीने एका लग्न सभागृहावर कारवाई करत ५० हजारांचा दंड ठोठावला असताना पालिका आणि पोलीस मात्र या जत्रांवर जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. या जत्रांना परवानगी देताना अग्निशमन विभागाची आणि वाहतूक पोलिसांची परवानगी घेणे बंधनकारक करत आहे, असे पालिका सांगत आहे. तर  परवानगी हा पोलिसांचा विषय नाही, अशी री पोलीस ओढत आहेत. असे असतानाही या बेकायदा जत्रा कशा भरवल्या जातात, असा सवाल निर्माण होत आहे.

नालासोपारा चंदन नाका येथे आयोजित आनंद मेला या जत्रेत रात्रीच्या वेळी जुगारसुद्धा चालत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याचबरोबर या सर्व ठिकाणी हजारोच्या संख्येने ग्राहकांची रेलचेल सुरू असते. सुरक्षिततेचे कोणतेही नियम न पाळता या जत्रा बिनदिक्कत सुरू आहेत. यामुळे करोना प्रसार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. महानगर पालिका करोना प्रसार रोखण्यासाठी निर्बंध घालत सार्वजनिक कार्यक्रम बंद पडत असतना नियमांची पायमल्ली करणाऱ्या या जत्रांवर कारवाई का नाही, असा सवाल नागरिक विचारत आहेत.

‘ओमायक्रॉन’चा धोका

वसई-विरारमध्ये सण आणि लग्न समारंभांच्या धर्तीवर शहरातील वाढत्या गर्दीने करोना संसर्ग वाढण्याचा धोका वाढला आहे.   वसई-विरारमध्ये ओमायक्रॉन या करोना विषाणूचा शिरकाव झाला होता, पण प्रशासनाच्या खबरदारीने याचा फैलाव रोखण्यात यश आले होते.  डिसेंबर महिन्याच्या आकडेवाडीनुसार  ४३६ रुग्ण आढळले आहे. तर अजूनही २०६ रुग्ण उपचाराधीन आहेत. १४ जणांचा मृत्यू झाला आहे.   सोमवारी २५ रुग्ण आढळून आले होते. तसेच रुग्णवाढीचा दरसुद्धा  ०.३  ते ०.५ टक्के असा आहे.  पालिकेने मोठय़ा गर्दी होणाऱ्या दुकानांवर, सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध घातले आहेत. पण जाणीवपूर्वक या निर्बंधांचे पालन केले जात नाही.  यामुळे वाढती गर्दी ही ओमायक्रॉनच्या रुग्ण वाढण्यास खतपाणी घालणारी असल्याचे आढळून येते. नालासोपारा, विरार आणि वसईच्या रेल्वे स्थानकांच्या आसपासचा परिसरात मोठय़ा प्रमाणात फेरीवाल्यांनी कब्जा केला आहे. त्यात ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे.