धूलिकण नियंत्रण आणि हवा शुद्धीकरण यंत्रे बसवणार

कल्पेश भोईर

वसई: वसई विरार शहरातील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिकेकडून पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. यात हवेत उडणारे धूलिकण शोषून त्यावर नियंत्रण मिळवणारी यंत्रणा व हवा शुद्धीकरण यंत्रणा अशी यंत्रणा विविध ठिकाणच्या भागात कार्यान्वित करून प्रदूषण नियंत्रण केले जाणार आहे. वसई विरार शहराचे झपाटय़ाने नागरीकरण वाढू लागले आहे. रस्त्यावरील वाढती वाहतूक व विविध ठिकाणी सुरू असलेले बांधकामांचे प्रकल्प यामुळे शहरात प्रदूषण वाढू लागले आहे. या वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर पालिकेकडून आता प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

राष्ट्रीय हवा शुद्धीकरण उपक्रमाच्या अंतर्गत पालिकेच्या कार्यक्षेत्रात विविध ठिकाणच्या भागात यंत्रणा बसविण्याचे काम केले जाणार आहे, यासाठी पालिकेकडून कृती आराखडा ही तयार करण्यात आला आहे. यामध्ये शहरातील ६ ठिकाणी धूलिकण नियंत्रण यंत्रणा बसविली जाणार आहे. यासाठी १ कोटी ८० लाख रुपये इतका निधी खर्च केला जाणार असून याची निविदा ही काढण्यात आली आहे. या यंत्रणा बसविण्यात शहरातील प्रमुख वर्दळीची ठिकाणांची निवड केली असून यात अग्रवाल वसई, बंजारा हॉटेल विरार पूर्व, मॅगनम हॉटेल विरार पूर्व, मधुरम हॉटेल विरार पूर्व, सातीवली खिंड वसई, आचोळे चौक अग्निशमन केंद्रा समोर अशा सहा ठिकाणी लावण्यात येणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून हवेतील धूलिकण नियंत्रण केले जाणार असून पाण्याच्या अतिसुक्ष्म थेंबांची फवारणी करून हवेतील धुलीकण नियंत्रित ठेवले जातात. या यंत्रणेमध्ये पाण्याची टाकी असते. त्यात पाणी साठवून सूक्ष्म आकाराच्या नोझल्समधून पाण्याची फवारणी करून हवेतील नियंत्रण केली जाणार आहे. अशा प्रकारच्या यंत्रणेमुळे शहरातील प्रदूषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार असल्याचा विश्वास पालिकेने व्यक्त केला आहे.

६ ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रणा

मागील काही वर्षांत वसई विरार शहरात वाढत्या प्रदूषणामुळे हवेची गुणवत्ता ही घसरू लागली आहे. याचा परिणाम हा शहरात दिसून येत आहे. शहरातील नागरिकांना प्रदूषणविरहित हवा मिळावी यासाठी पालिकेकडून शहरातील सहा ठिकाणी हवा शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचा ही निर्णय घेतला आहे. यासाठी २४ लाख रुपये इतक्या निधीची तरतूद केली आहे. ही यंत्रणा बसविण्यासाठी जागेचा शोध सुरू आहे.

शहरात हवा शुद्धीकरण यंत्रणा व धूलिकण नियंत्रण यंत्रणा बसविण्यात येणार आहेत. यासाठीचे नियोजन सुरू असून लवकरच या यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

– राजेंद्र लाड, कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग महापालिका

Story img Loader