कल्पेश भोईर
सुशोभीकरणाच्या नावाखाली शहरातील तलावे बुजवली जात आहेत. या तलावांचे क्षेत्रफळ कमी करून परिसरातील जागा हडप केल्या जात आहेत. सुशोभीकरण करताना तलाव बुजवली जातात आणि तलावांचे नैसर्गिक पाण्याचे झरेदेखील बंद होऊ लागली आहेत. त्यामुळे शहरातली तलावे ही एकप्रकारची मृत डबकी ठरू लागली आहेत.

विरारमधील नंदाखाल गावातील पुरातन तलावाचे सुशोभीकरणाचे काम पालिकेने हाती घेतले. त्यासाठी तलावाच्या २० फूट आंतर्भूत बांधण्यात आली. ही बाब जागरूक नागरिकांच्या लक्षात आली. ‘लोकसत्ता’ने या प्रकरणाला वाचा फोडली. पालिकेकडे तक्रारी सुरू झाल्या. सुशोभीकरणाच्या नावाखाली तलाव बुजवण्याचा आरोप झाला. अखेर पालिकेला ते काम थांबवावे लागेल. मात्र तलाव बुजविण्याचा एक प्रकार थांबला असला तरी शहरातील अनेक तलाव अशा प्रकारे हळूहळू बुजविण्यात येत आहेत.वसई, विरार शहर हे तलावांचे शहर म्हणून ओळखले जाते. मात्र याच शहरात सध्या विकासाच्या नावाखाली तलावांचा बळी दिला जात आहे. वसई, विरारमधील पूर्व पश्चिमेच्या विविध ठिकाणच्या भागात मोठय़ा संख्येने नैसर्गिक तलाव व शेततळी (बावखल) आहेत. अनेक वर्षे जुने असलेल्या तलावांची विशेष अशी ओळख आहे. तर काही तलाव हे पुरातन काळापासूनची आहेत.

सुरुवातीच्या काळात पाण्याचा एकमेव स्रोत म्हणून या तलावांकडे पाहिले जात होते. याशिवाय जमिनीतील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास ही अधिक फायदेशीर ठरत होती. परंतु बदलत्या काळाच्या ओघात शहरातील तलावांचे चित्रच बदलून गेले असून सध्या ही तलाव केवळ नावापुरतीच शिल्लक राहिले आहेत. शहराच्या व गावाच्या सौंदर्यात खऱ्या अर्थाने भर टाकणारे हे तलाव संवर्धनाच्या अभावामुळे दुर्लक्षित होऊ लागली आहेत.
तलावे आणि बावखले ही नैसर्गिक वसईच्या पर्यावरण चक्रामधील महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. वसईतील अनेक बावखले ही यापूर्वीच बुजविण्यात आली आहेत. तर दुसरीकडे आता पालिकेकडून तलाव सुशोभीकरण करताना नैसर्गिक जलस्त्रोतावरच घाव घालून त्या ठिकाणी असलेले नैसर्गिक झरे हे बंद करण्यात येऊ लागले आहेत. तलावाच्या खाली नैसर्गिक पाण्याचे झरे असतात. त्यामुळे सतत पाण्याचा प्रवाह सुरू असतो. यामुळे विविध जलचर प्राणी, सागरी जीव, मासे तलावात असतात. पर्यावरण चक्रासाठी ते महत्त्वाचे घटक असतात. परंतु सुशोभीकरणाच्या नावाखाली हे झरे बुजवले जात असल्याने तलावांचे मृत डबके तयार होत आहेत. या प्रकारामुळे तलावांचे अस्तित्व टिकणार कसे असा प्रश्न पर्यावरणप्रेमींनी उपस्थित केला आहे.

तसेच वसईत आता विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणच्या भागात तलावात माती भराव टाकून ते बुजविण्याचे काम सुरू झाले आहे. नुकताच वसई पश्चिमेच्या भुईगाव परिसरात शासकीय जागेतील सव्‍‌र्हे क्रमांक १४९ अ व बमध्ये असलेल्या तलावात माती भराव टाकून तलाव बुजवून अतिक्रमण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तर भुईगाव मध्येच ५० वर्षे जुना असलेल्या तलाव माती भराव टाकून बुजविण्यात आला आहे. त्यापाठोपाठ महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणासाठी विरारच्या नंदाखाल येथील पुरातन तलावाच्या आतच भिंत बांधली जात असल्याने तलावाचे क्षेत्रफळ कमी करण्यात येत आहे.

वसईतील विविध सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमीं यांच्यामार्फत सातत्याने तलावांच्या संवर्धनाच्या संदर्भात आवाज उठवीत असतात. परंतु प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मागील काही वर्षांत वसई, विरार शहरांत महापालिकेने सुशोभीकरण करण्यावर भर दिला आहे. परंतु तलाव सुशोभित केले जात असताना त्यातील नैसर्गिक झरे शाबूत ठेवायला हवे होते. खरे तर तलाव सुशोभित करण्याऐवजी त्यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. माती, दगड यांचे पिचिंग करून संरक्षक बंधारे तयार करायला हवे, आता मात्र थेट तलावातच सिमेंट काँक्रीटच्या भिंती उभारण्यात आल्याने तलावांचे डबक्यात रूपांतर होऊ लागले आहे. पालिकेने सुशोभित केलेले तलाव यांच्या देखभाल दुरुस्तीकडे लक्ष दिले जात नसल्याने अनेक तलावांच्या भिंती तुटलेल्या स्थितीत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून आचोळे येथील तलावाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. तर गोखीवरे येथील तलावाचेही डबके तयार झाले आहे.

तलावांची स्वच्छता ही वेळोवेळी केली जात नसल्याने अनेक ठिकाणी तलावात कचऱ्याचे साम्राज्य दिसून येत आहे. तसेच या तलावांमधील पाणी पिण्यायोग्य तर नाहीच; मात्र इतर वापरासाठीही या पाण्याचा विचार केला जात नाही, अशी परिस्थिती आहे त्यामुळे तलावांच्या संवर्धनाकडे गांभीर्याने पाहण्याची गरज सर्वसामान्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.वसई, विरारमध्ये अनेक तलावांवर जॉगिंग ट्रॅक, गार्डन आदी विकसित करण्यात येत आहे. यासाठी तलावांच्या मूळ साच्यात बदल केला जाऊ लागला आहे. साच्यात बदल होत असल्याने अनेक तलावांचे क्षेत्रफळ कमी झाले आहे. खरे तर उद्यानांसाठी शहरातील असलेल्या मोकळय़ा जागा या पालिकेने ताब्यात घेऊन त्यामध्ये उद्यान तयार करणे गरजेचे होते. मात्र त्याही जागा भूमाफियांनी गिळंकृत केल्या आहेत. तलाव जपणे ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. पण या महत्त्वपूर्ण नैसर्गिक स्रोताचे जतन केले जात नाही. तलावांचे जतन व संवर्धन करण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घ्यायला हवा, तरच येत्या काळामध्ये तलावाचे नैसर्गिक रूप जपता येईल.

Story img Loader