कल्पेश भोईर
वसई : वसईच्या किनारपट्टीची होणारी धूप व लाटांच्या तडाख्याने किनारपट्टीच्या भागातील होणारे नुकसान टाळण्यासाठी धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्यात येत आहेत. ही कामे प्रगतिपथावर असून पावसाळय़ापूर्वी अर्नाळा व अर्नाळा किल्ला येथील धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे पूर्ण केली जाणार आहेत.
धूपप्रतिबंधक बंधारा नसल्याने किनारपट्टीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांना गेल्या अनेक वर्षांपासून विविध समस्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: पावसाळय़ात व भरतीच्या वेळी या किनारपट्टीच्या भागात मोठमोठय़ा लाटा किनाऱ्यावर आदळतात याचाच फटका हा किनाऱ्यालगत असलेल्या घरांना बसतो. त्यातच बेसुमार वाळू उपसा, कचरा, किनाऱ्यालगत असलेली सुरूची झाडे भरतीच्या पाण्यामुळे नष्ट झाली आहेत. तर दुसरीकडे बंधारा नसल्याने पाणी थेट समुद्रकिनाऱ्यावरील विविध भागांत घुसून किनाऱ्यावरील घरे, शेती, बागायती, वाळत ठेवलेली मासळी यांचे मोठे नुकसान होते यासाठी या भागात धूपप्रतिबंधक बंधारे तयार करण्यात यावेत अशी मागणी केली होती. त्या मागणीनुसार पतन विभागाने अर्नाळा किल्ला २५० मीटर, अर्नाळा १५० मीटर, रानगाव, भुईगाव, कळंब प्रत्येकी १०० मीटर अशा पाच ठिकाणच्या किनारपट्टीच्या भागात ही कामे सुरू केली होती. यातील भुईगाव व कळंब या दोन्ही ठिकाणचे बांधून पूर्ण झाले आहेत. तर सध्या अर्नाळा किल्ला येथील कामही वेगाने सुरू झाले असून भिंती उभारण्याचे काम पूर्ण झाले आहे. अर्नाळा येथील बंधाऱ्यांचे कामही तांत्रिक मंजुरीच्या स्तरावर आहे. लवकरच याची कामे मार्गी लावण्यासाठी पतन विभागाचे प्रयत्न सुरू असल्याचे उपअभियंता राजू बोबडे यांनी सांगितले आहे. तर रानगाव येथील ३७० मीटर लांबीच्या बंधाऱ्यासाठी ३.५० कोटींची निविदा काढण्यात आली आहे. लवकरच त्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू केले जाणार आहे, असे बोबडे यांनी सांगितले आहे. किनारपट्टीच्या भागाला धूपप्रतिबंधक बंधाऱ्याचे कवच मिळाल्याने किनारपट्टीच्या भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
१) दगड वाहतुकीसाठी अडचणी
अर्नाळा किल्ल्यात जाण्यासाठी बोटींने जावे लागत आहे. सध्या या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याचे काम सुरू आहे. अशा ठिकाणी मोठमोठे दगड मोठय़ा बोटीत टाकून न्यावे लागत आहेत. अशा वेळी अधूनमधून वाहतूक करताना अडचणी निर्माण होत असतात.
२) धूपप्रतिबंधक बंधारे व मजबुतीकरणासाठी निधीची तरतूद.
वसईतील धूपप्रतिबंधक बंधारे तयार करणे व त्यांच्या देखभाल- दुरुस्तीसाठी चालू आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये १ कोटी १ लाख ९७ हजार इतक्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये अर्नाळा किल्ला येथे धूपप्रतिबंधक बंधारा तयार केला जाणार आहे. त्यासाठी ४७ लाख ४४ हजार तर पाचूबंदर ते लागेबंदर येथील बंधारा मजबुतीकरण करण्यासाठी ५४ लाख ५३ हजार इतक्या निधीची तरतूद केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा