लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
वसई : वसई विरार महापालिकेत २९ गावांच्या समावेशाला आलेल्या हरकतींवरील सुनावणीला ग्रामस्थांनी थंड प्रतिसाद दिला आहे. सुनावणीच्या ५ दिवसांची कालावधीत फारसे कुणी फिरकले नाहीत. त्यामुळे आता सुनावणीसाठी ३ दिवसांची वाढीव मुदत देण्यात आली आहे. सोमवार २३ ते गुरूवार २६ अशी ३ दिवस ही सुनावणी वाढविण्यात आली आहे.
राज्य शासनाने फेब्रुवारी २०२४ मध्ये २९ गावांचा पुन्हा महापालिकेत समावेश करत असल्याची अधिसूचना काढली होती. त्यावर ३१ हजार हरकती आणि सूचना आल्या होत्या. या हरकतींवर सोमवार पासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी ठेवण्यात आली होती. १६ डिसेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत ही सुनावणी पालघर जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली होती. मात्र ही सुनावणी प्रक्रिया बेकायदेशीर असल्याने ग्रामस्थांनी बहिष्कार घातला होता. त्यामुळे सुनावणीचा कालावधी संपल्याने कुणीही ग्रामस्थ सुनावणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहिले नाही.
आणखी वाचा-पोलिसांमधील वाद विकोपाला, नवीन पोलिसांचा बदली रद्द करण्याला विरोध
त्यामुळे सुनावणीसाठी आणखी ४ दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. सोमवार २३ डिसेंबर ते गुरूवार २६ डिसेंबर या कालावधीत ही सुनावणी होणार आहे. त्यातही २५ डिसेंबर हा सुटीचा दिवस वगळण्यात आला आहे. अपरिहार्य कारणास्तव सुनावणीस उपस्थित न राहिलेल्या अर्जदारांसाठी पुनश्चः सुनावणी तारखा जाहीर करण्यात आल्याचे वसई विरार महापालिकेने सांगितले आहे. सुनावणी साठी हरकती अर्ज सादर केलेल्या अर्जदारांना सुनावणीस उपस्थित राहणे कामी नोटीसा बजावण्यात आल्या आहेत
या गावांसाठी होणार सुनावणी
सोमवार २३ डिसेंबर रोजी आगाशी कोफराड ससूनवघर, बापाणे ग्रामपंचायत यांमधील अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात येईल. मंगळवारी २४ डिसेंबर रोजी भुईगाव बुद्रुक, गास तसेच वाघोली, दहिसर, राजोडी, भुईगाव खुर्द, गिरिज, कौलार बुद्रुक तसेच वटार, चांदीप, कौलार खुर्द, नवाले, निर्मळ तसेच कशिद कोपर, कसराळी, कोशिंबे ग्रामपंचायत यांमधील अर्जदारांच्या अर्जावर तर गुरूवार २६ डिसेंबर रोजी चिंचोटी, कोल्ही चिंचोटी, कामण, कणेर, मांडवी, शिरसाड, सालोली ग्रामपंचायत यांमधील अर्जदारांच्या अर्जावर सुनावणी घेण्यात येणार आहे.