वसई: विधानसभा निवडणुकीत झालेल्या सत्ताबदलाचे परिणाम आता मॅरेथॉन स्पर्धेवर दिसू लागले आहेत. मॅरेथॉन साठी जागोजागी उभारण्यात आलेल्या मंडप आणि झाडांवर पिवळ्या रंगाऐवजी भाजप च्या झेंड्यांच्या रंग वापरण्यात आला आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये वसईतील सत्ताधारी बहुजन विकास आघाडीचा पराभव झाला आहे. वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघात भाजपचे उमेदवार जिंकून आले आहेत. यामुळे वसई विरारवर आता भाजपचे वर्चस्व निर्माण झाले आहे. त्याचे परिमाण आता दिसू लागले आहेत. पिवळा रंग हा बहुजन विकास आघाडीचा आहे.
हेही वाचा >>> डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा उभारण्यास चालढकल; संतप्त कार्यकर्त्यांचे ३ तास ठिय्या आंदोलन
पालिकेच्या सर्वच कार्यक्रमात या रंगाचा वापर केला जातो. रविवारी शहरात मॅरेथॉन स्पर्धा होत आहे. त्याची तयारी सुरू असून जागोजागी मंडप उभारण्यात येत आहे. परंतु यंदा प्रथमच या मंडपांवरील पिवळा रंग काढून भगवा, तिरंगा आणि भाजप पक्षाचे रंग लावण्यात आले आहेत. मॅरेथॉनच्या मार्गिकेवर असलेल्या झाडांना देखील भाजपच्या झेंड्यांचा रंग लावण्यात आला आहे.
जर पालिकेच्या कार्यक्रमाना राजकीय रंग नको असेल तर भाजपचा रंग का दिला गेला असा सवाल बविआ च्या कार्यकर्त्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी वसईच्या आमदार स्नेहा दुबे पंडित यांनी पालिकेच्या कार्यक्रमान शासकीय रंग नको असे विधान केले होते. त्यांचा इशारा बविआ कडे होता. बविआ पक्षाच्या रंगला हटवले असले तरी भाजप च्या रंगाचा वापर करण्यात आला आहे.