वसई: एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मागील काही महिन्यांपासून एसटी सेवेचा ताळमेळ बिघडला होता. आता ही सेवा पुन्हा एकदा सुरळीत सुरू झाल्याने वसईच्या ग्रामीण भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
वसईतील नवघर, वसई, अर्नाळा, नालासोपारा अशा विविध ठिकाणच्या आगारांतून ग्रामीण भागातील विविध ठिकाणच्या भागात एसटी सेवा पुरविली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून आपल्या मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता त्यामुळे या भागातील एसटीसेवा ही ठप्प झाली होती. या भागातील प्रवासी, भाजी विक्रेत्या महिला, विद्यार्थी यांना प्रवासासाठी अडचणी निर्माण झाल्या होत्या. याशिवाय प्रवासासाठी अधिकचे पैसे देऊन प्रवास करावा लागत होता. दीर्घकाळ चाललेल्या संपानंतर एसटी कर्मचारी आता कामावर पुन्हा रुजू होऊ लागल्याने वसईच्या ग्रामीण भागात एसटी धावू लागली आहे. ग्रामीण भागातील प्रवासाची जीवनवाहिनी असलेल्या लालपरीची सेवा पूर्वपदावर येत असल्याने शाळेसह , महाविद्यालयीन व उच्च शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी, कामधंद्यानिमित्ताने बाहेर पडणारे कामगार, सामानसुमान विकणारे विक्रेते , यांच्यासह शेतकरी यांना मोठा दिलासा मिळू लागला असून त्यांनी पुन्हा जोमाने आपला एसटीचा प्रवास सुरू केला आहे.

Story img Loader