वसई: शहरातील ४६ लसीकरण केंद्रे तात्पुरती बंद करून ५ जम्बो लसीकरण केंद्रे सुरू करण्याच्या निर्णयावर ठाम असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. दरम्यान, शहरात केवळ ५ केंद्रे ठेवण्याच्या निर्णयाला विविध स्तरातून विरोध करण्यात येत आहे.

वसई विरार महापालिकेचे एकूण ५१ लसीकरण केंद्रे होते. लशींचा तुटवडा, कर्मचाऱ्यांची वानवा असल्याने पालिकेने केवळ ५ केंद्रात लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. (याबाबतचे वृत्त शनिवार १७ जुलैच्या अंकात लोकसत्ता वसई विरार सहदैनिकात प्रसिद्ध झाले होते.) पालिका लसीकरण केंद्रे बंद करणार असल्याच्या निर्णयाची तीव्र पडसाद वसई विरार शहरात उमटले होते. यापूर्वी पालिकेने फिरते मोबाईल लसीकरण केंद्रे बंद केली होती. आता आणखी केंद्रे बंद केल्याने या रोषात भर पडली आहे. मात्र आयुक्तांनी जम्बो लसीकरण केंद्र सुरू करणार असल्याचा निर्णयावर ठाम असल्याचे सांगितले.

शहरातील ५ मध्यवर्ती ठिकाणी लसीकरण केंद्र असल्याने नागरिकांची गैरसोयी होणार नाही तसेच सर्वाना एकाच ठिकाणी लस मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. लशी मुबलक प्रमाणात आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. या सर्व लशी ५ केंद्रावर असल्याने त्याचे नियोजन व्यवस्थित होईल, असेही आयुक्त गंगाथरन डी. यांनी ‘लोकसत्ता’शी बोलतांना सांगितले. इतर केंद्रे तात्पुरती बंद करण्यात येत आहेत. जेव्हा लशींचा मुबलक साठा येईल, तेव्हा ही केंद्रे पुन्हा सुरू केली जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष देहरकर (आरोग्य) यांनी देखील ५ लसीकरण केंद्रे अद्ययावत करण्यात येत असल्याचे सांगितले. यापुढे येणाऱ्या सर्व लशी या पाच केंद्रात दिल्या जाणार आहेत. तसा प्रस्ताव काही दिवसांपूर्वी आला आणि त्यावर काम सुरू आहे. येत्या काही दिवसात ही ५ केंद्रे सुरू होतील आणि इतर केंद्रे बंद केली जातील, असेही ते म्हणाले.

केंद्रे बंद करण्यास विरोध

दरम्यान, इतर केंद्रे बंद करण्यास विविध पक्षांनी विरोध केला आहे. जी पाच केंद्रे सुरू राहणार आहेत त्यातील दोन केंद्रे पाण्याखाली गेली आहेत. केवळ ५ केंद्र सुरू ठेवली तर शहरातील इतर नागरिकांची गैरसोय होईल त्यामुळे हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी शिवसेनेच्या माजी नगरसेविका किरण चेंदवणकर यांनी आयुक्तांकडे केली आहे. पाच केंद्राच्या निर्णयामुळे गर्दी वाढेल आणि करोनाचा संसर्ग होईल, असे भाजपाचे सरचिटणीस मुकुंद मुळ्ये यांनी व्यक्त केली आहे. एकीकडे घरोघरी जाऊन लसीकरण करावे असे सांगितले जात असताना दुसरीकडे पालिका केंद्र बंद करत असल्याचा निर्णय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले.

आरोग्य अधिकाऱ्यांचा खोटेपणा आयुक्तांकडून उघड

केवळ ५ केंद्रे सुरू करून इतर केंद्रे बंद करणार असल्याचे वृत्त शनिवारी ‘लोकसत्ता’मध्ये आल्यानंतर पालिकेवर टीका होऊ लागली होती. ही माहिती स्वत: दिल्यानंतरही आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी घूमजाव केले आणि प्रसिद्धी पत्रक काढून या वृत्ताचे खंडन केले होते. मात्र आयुक्तांनी आरोग्य अधिकाऱ्यांचे पितळ उघडे पाडत केंद्रे तात्पुरते बंद करणार असल्याचे सांगितले.

शहरातील ४६ केंद्रे तात्पुरती बंद करत आहोत. केवळ ५ केंद्रात जम्बो लसीकरण करण्यात येईल. भविष्यात लसी आल्यावर इतर केंद्रे सुरू केली जातील. आरोग्य अधिकाऱ्यांनी काढलेली प्रसिद्धी पत्रक गैरसमजामधून काढले आहे.

– गंगाधरन डी., आयुक्त, वसई विरार महापालिका

कुठलीही लस केंद्रे बंद केली जाणार नाही. याबाबत पालिकेकडून देण्यात आलेली माहिती चुकीची आहे. मी आरोग्य अधिकारी असल्याने मी निर्णय घेणार आहे.

– डॉ. सुरेखा वाळके, मुख्य वैद्यकीय अधिकारी

५ जम्बो लसीकरण केंद्रे तयार करण्याचे काम सुरू आहे. आठवडय़ाभरात ही ५ जम्बो लसीकरण केंद्रे सुरू होतील.

– संतोष देहरकर, अतिरिक्त आयुक्त, वसई विरार महापालिका