वसई : वसई विरार शहरात मागील काही वर्षांपासून रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तर दुसरीकडे सातत्याने खड्ड्यांची दुरुस्ती करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतो. यासाठी शहरांतर्गत अति खड्डे ज्या ठिकाणी पडतात त्या ठिकाणचे रस्त्यांचे कॉंक्रिटिकरण केले जाणार. पहिल्या टप्प्यात ११४ ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत.

वसई विरार शहराचे झपाट्याने नागरीकरण वाढत आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ प्रचंड वाढली आहे. महापालिकेच्या कार्यक्षेत्रात १ हजार १६ किलोमीटर लांबीचे डांबरीकरण केलेले रस्ते आहेत. दरवर्षी पावसाळ्यात शहरातील विविध ठिकाणच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य तयार होते.याच वाहनचालकांना मोठा फटका बसतो. खड्ड्यामुळे वाहतूकीचा वेग कमी होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. तर काही वेळा अपघातासारख्या घटना घडतात.

विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचण्याचे प्रमाण अधिक असल्याने  लवकर खड्डे तयार होत आहेत. डांबरी करण केलेले रस्ते सातत्याने फुटून खड्डे तयार होतात. त्या खड्ड्यांची पालिकेला वरचे वर तात्पुरता दुरुस्ती करावी लागते. त्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला कोट्यवधी रुपये खर्च करावे लागतात. रस्त्यावरील खड्ड्यांची समस्या सुटावी यासाठी पालिकेने शहरातील रस्ते हे टप्प्याटप्प्याने काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

या सुरवातीला जी अति वसई, नालासोपारा पूर्व, विरार, नायगाव अशा अंतर्गत रस्त्यावरील अति खड्ड्यांची ठिकाणे आहेत. त्यावर लक्ष केंद्रित करून आधी त्या ठिकाणचे रस्ते कॉंक्रिटिकरण करवून घेण्याचा प्रयत्न आहे.यासाठी शहरातील रस्त्यांचे बांधकाम विभागाच्या पथकाने सर्वेक्षण करून आतापर्यंत ११४ ठिकाणे निश्चित करण्यात आली असून त्या ठिकाणी काँक्रिटीकरण करण्याचे काम लवकरच सुरू केले जाईल असे महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी सांगितले आहे.

दरवर्षी शहरात खड्ड्यांची समस्या निर्माण होते. यासाठी आता शहरातीलरस्ते काँक्रिटिकरण करून रस्ते मजबूत केले जातील. त्यामुळे खड्ड्यांच्या प्रमाण ही कमी होईल. -अनिलकुमार पवार, आयुक्त वसई विरार महापालिका

काँक्रिटीकरणासाठी स्वतंत्र १५० कोटींचे नियोजन

पावसाळ्यात खड्ड्यांची समस्या ही सर्वाधिक निर्माण होते.यासाठी ते खड्डे कमी करता यावे व दुरुस्तीवर होणार खर्च कमी कसा करता येईल याचा अनुषंगाने पालिका विचार करीत असून नुकताच सादर केलेल्या अर्थसंकल्पात काँक्रीटकरणाच्या कामासाठी स्वतंत्र तरतूद केली आहे.एकूणच आता निश्चित केलेल्या ठिकाणी काँक्रिटीकरणासाठी २०८ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. परंतु पहिल्या टप्प्यात १५० कोटींचे नियोजन करून पालिकेकडून कामे पूर्ण करवून घेतली जाणार असल्याचे पालिकेने सांगितले आहे.

गुणवत्ता पूर्ण कामावर भर द्या

वसई विरार शहरात महापालिकेकडून विविध ठिकाणी रस्त्यांची कामे हाती घेतली जातात. मात्र काही ठिकाणी रस्ते तयार करताना योग्य ते नियोजन नसल्याने रस्त्याची उंच सखल अशी स्थिती तयार होते. रस्ते तयार करताना त्यांचे खोदकाम करून व्यवस्थित पिचिंग केली गेली पाहिजे. तरच त्या रस्त्याची गुणवत्ता टिकून राहील. तर दुसरीकडे कामे सुरू करताना सर्वसामान्य नागरिकांना व वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे.