लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : मुंबई बडोदा बुलेट ट्रेनसाठी पालघर जिल्ह्यातील वैतरणा खाडीवर सुमारे दोन किलोमीटर लांबीचा पुल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या निर्मितीच्या कामासाठी खाडीवर एका तात्पुरत्या पुलाच्या उभारणीचे काम सुरू करण्यात आले आहे. मुख्य पुलाच्या निमिर्तीसाठी साहित्य, अवजड वाहनांची ये-जा करण्यासाठी या पुलाचा उपयोग होणार आहे.

मुंबई-अहमदाबाद या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या ५०८ किमी लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रगतीपथावर आहे. या बुलेट ट्रेनचा मार्ग पालघर जिल्ह्यातून जातो. पालघर जिल्ह्यात वैतरणा खाडीवर त्यासाठी २. ३२ किलोमीटर लांबीचा पूल बांधण्यात येणार आहे. या पूलाच्या निर्मितीसाठी साधनसामुग्री, वाहने आणि इतर कामांसाठी जागेची आवश्यकता आहे. यासाठी खाडीवर प्रस्तावित पुलाच्या समांतर तात्पुरता पुल उभारण्याचे काम सुरू झाले आहे. या तात्पुरत्या पुलाची लांबी देखील प्रस्तावित पुलाएवढीच असणार आहे. हा तात्पुरता पुल तयार झाल्यानंतर मुख्य पुलाचे काम हाती घेण्यात येणार आहे, अशी माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या (एनएचएसआरसीएल) जनसंपर्क विभागाकडून देण्यात आली आहे.

आणखी वाचा-वसई : ८ लाखांचे कर्ज फेडण्यासाठी तरुणाची योजना, प्रेयसीच्या मदतीने मामाच्या घरात चोरी

मुख्य पूलाच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. हा पूल विरार आणि बोईसर बुलेट ट्रेन स्थानकामध्ये असणार आहे. त्यात ५९ पिलर आणि प्रत्येकी ४० मीटरचे ५८ स्पॅन असणार आहेत. याची लांबी २. ३२ किलमीटर एवढी असून तो बुलेट प्रकल्पातील सर्वात मोठा पूल ठरणार आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी कास्टिंग यार्ड मध्ये एक हजार फुल स्पॅन बॉक्स गर्डर निर्मितीचे काम पूर्ण झाले असून बुलेट ट्रेनचे गुजरात राज्यातील बडोदा आणि वापी येथील समर्पित कास्टिंग यार्डमध्ये पूर्ण होत आहे.

आणखी वाचा- नागरिकांच्या रोषामुळे क्लस्टर योजनेचे सर्व्हेक्षण थांबवले

अशी आहे बुलेट ट्रेन

ही बुलेट ट्रेन वसई तालुक्यातील २१ आणि वसई विरार शहर महानगरपालिका क्षेत्रातील १४ गावातून जाणार आहे. वसईतून तो एकूण २६.५ किलोमीटर लांबीचा आहे. या बुलेट ट्रेनसाठी गुजरातमध्ये आठ आणि महाराष्ट्रात चार अशा एकूण १२ स्थानके बांधण्यात येणार आहेत. त्यात महाराष्ट्रातील वांद्रे– कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर आणि गुजराथ मधील वापी, बिलीमोरा, सुरत, भरूच, बडोदे, आनंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचा समावेश आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Construction of bridge over vaitarna bay for bullet train is underway mrj