भाईंदर :-मिरा रोड येथील सृष्टी भागात असलेल्या खारफुटी क्षेत्रात गटाराचे बांधकाम केले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे यातून निघणारा मातीचा ढिगारा थेट जवळील कांदळवनात टाकून ती नष्ट करण्याचा प्रकार सुरू आहे.त्यामुळे कांदळवन क्षेत्र नष्ट होण्याची शक्यता आहे. या प्रकाराबाबत येथील पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येते आहे.मिरा भाईंदर हे शहर खाडी किनारी वसलेले असल्यामुळे येथील मोठा परिसर हा खारफुटी क्षेत्रात मोडतो.मात्र मागील काही वर्षात याच खारफुटी क्षेत्राला नष्ट करून बांधकाम उभारले जात आहे.मिरारोडच्या सृष्टी परिसरात असलेल्या खारफुटी क्षेत्रात देखील नव्याने नाल्याची उभारणी केली जात असल्याचे समोर आले आहे. यासाठी जमिनीत खोल खड्डा करून काँक्रीटचे बांधकाम उभारण्यात येत आहे.
मात्र हे काम करत असतानाच त्यातून निघणारा मलबा व माती थेट जवळच असलेल्या कांदळवन झाडांवर टाकण्यात येत आहे. या मातीच्या ढिगाऱ्याखाली ही झाडे दबून मृत होण्याची शक्यता आहे. असाच प्रकार जर सुरू राहिला कांदळवन झाडे नष्ट होतील असे नागरिकांनी सांगितले आहे.पालिकेने विकास कामांचे नियोजन करताना पर्यावरणीय दृष्टीने कोणती हानी होणार नाही याची काळजी घ्यायला हवी मात्र तसे होत नसल्याने विविध प्रकल्पांच्या कामात पर्यावरणाचे नुकसान केले जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केला आहे. ज्या ठिकाणी गटाराचे काम सुरू आहे.त्याठिकाणी कांदळवन नष्ट होणार नाही यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे.
कांदळवने नष्ट करण्याचा प्रकार सुरूच
शासनाने कांदळवन झाडांना संरक्षित करण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले असून त्यासाठी कठोर कायदा देखील केला आहे.मात्र तरी देखील वारंवार कांदळवन क्षेत्रात भरणी व वृक्ष तोड सारखे प्रकार घडत आहेत. यामुळे पर्यावरण प्रेमी संतप्त झाले आहेत.
कामाबाबत संभ्रम
मिरा रोड येथील सृष्टी परिसरात सुरु असलेल्या नव्या नाल्याबाबत मिरा भाईंदर महापालिकडे विचारणा केली असता सदर काम एमएमआरडीए मार्फत सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.तर याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्याकडून पालिकेवर बोट दाखण्यात येत आहे.मात्र महापालिका क्षेत्रात सुरु असेलेल्या कामांवर लक्ष ठेवणे तसेच वेळोवेळी त्याची पाहणी करण्याची जबाबदारी महापालिका अधिकाऱ्यांवर असताना देखील त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्यामुळे असे गैरप्रकार घडत असल्याची तक्रार जतीन दाधीज यांनी केली आहे.