भाईंदर: मीरा-भाईंदर शहरातील बऱ्याच गृहसंकुलात दुषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला असून शुद्ध पाणी खरेदी करण्याकरिता नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत असल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
मीरा-भाईंदर शहरात पाण्याची समस्या दिवसांदिवस अधिक जटील झाली आहे.त्यात आठवडय़ातील दोन तीन दिवस पाणी कपात करण्यात येत आहे.त्यात आता मीरा रोड मधील शांती नगर,शीतल नगर आणि भाईंदर पूर्व येथील काशी नगर व ज्योती पार्क परीसरात गेल्या चार दिवसांपासून दुषित पाणी येत असल्यामुळे महिला वर्गाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.तर दुषित पाण्याचे सेवन केल्यास नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे जेवण व इतर कामाकरिता कोणते पाणी वापरावे असा प्रश्न महिलांना पडला आहे.
घरगुती वापराकरिता शुद्ध पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे अनेकांना नाईलाजाने बाटलीबंद पाणी जास्त पैसे मोजुन खरेदी करावे लागत आहे.तर दुषित पाण्यामुळे टाक्या, भांडी खराब झाली असुन बाहेरुन पाणी विकत आणावे लागत आहे. दुषित पाण्यामुळे त्वचेचे आजार वाढण्याची भीती देखील जास्त निर्माण झाली आहे.
शहरात नवीन जलवाहिनी टाकण्यात आली आहे त्यामुळे पाणी थाडे खराब झाले आहे.तर या मुळे नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पाण्यात आवश्यक औषध टाकण्यात येत आहे
–सुरेश वाकोडे, कार्यकारी अभियंता (सार्वजनिक बांधकाम विभाग )