लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी
वसई- वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत एका इसमाची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. मोईन महम्मद (३८) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव आहे.
वसई पश्चिमेच्या सनसिटी येथे कासा द देरेजा या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. ते काम ठेकादार आवेश फारूख याने हाती घेतले आहे. या ठिकाणी आरोपी अरबाज आलम मजुरी काम करतो. त्याने ठेकेदाराचा भाऊ मोईन महम्मद याची शनिवारी रात्री डोक्यात लाकडी फळी घालून हत्या केली.
मध्यरात्री १२ च्या सुमारास पोलिसांना याबाबत माहिती मिळाली. अरबाज आलम याला ठेकेदाराने पगाराचे पैसे कमी दिले होते. त्याचा राग आल्याने त्याने ठेकेदाराच्या भावाची हत्या केल्याचा पोलिसांचा सशंय आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांची टीम रवाना झाली आहे, अशी माहिती माणिकपूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांनी दिली.