मीरा-भाईंदर पालिकेवर आर्थिक ताण येण्याची शक्यता

भाईंदर : मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेप्रमाणे मिरा भाईंदर शहरातीलदेखील ५०० चौरस फुटांखालील घरधारकांना सरसकट कर सवलत देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विशेष बाब म्हणजे आगामी पालिका निवडणुकीला डोळय़ासमोर ठेवून ही कर सवलत देण्याकरिता राजकीय पुढारीदेखील खटपट करत असून यामुळे पालिका तिजोरीवर मोठा आर्थिक ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून मिरा-भाईंदर शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाटय़ाने वाढत आहे. हा प्रादुर्भाव रोखण्याकरिता मीरा-भाईंदर महानगरपालिका प्रशासनाने युद्धपातळीवर प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे. याकरिता कोटय़वधी रुपयांचा खर्चही करण्यात आलेला आहे. राज्य शासनाकडे यापैकी सुमारे १२५ कोटी रुपयांचे अनुदान थकीत आहे. महानगरपालिकेला हे अनुदान आजवर न मिळाल्यामुळे विविध नागरी सुविधा पुरविणे आणि ठेकेदारांची देयके अदा करण्याकरिता प्रशासनाला ओव्हरड्राफ्टचा आधार घ्यावा लागला आहे.

गतवर्षांत या मिरा-भाईंदर शहरात कोरोनामुळे आपत्कालीन स्थिती निर्माण झालेली आहे. शहरातील दैनंदिन कामकाज, औद्योगिक, लघुउद्योग, व्यवसाय व उद्योगधंदे ठप्प झाल्याने नागरिकांना, व्यावसायिकांना तसेच हातावर पोट असलेल्या कामगारांना बऱ्याच आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांची आर्थिक परिस्थिती अगदीच बेताची झालेली असल्याने मिरा-भाईंदरमधील करदात्यांना घरपट्टीत ५० टक्के सवलत देण्यात यावी, असा ठराव विशेष महासभेत मंजूर केलेला होता.मात्र महापालिकेची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याचे कारण देत प्रशासनाने हा ठराव विखंडित करण्यासाठी राज्य शासनाकडे पाठविलेला आहे. आजही हा ठराव शासनाकडे निर्णयाअभावी प्रलंबित आहे. मात्र अशा परिस्थितीत मुंबई महानगरपालिकेतील ५०० चौरस फूट खालील घरांना कर सवलत देण्याची घोषणा नुकतीच मुख्यमंत्र्यांनी केली. त्यापाठोपाठ ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकेतीलदेखील घरमालकांना कर सवलत देण्याची घोषणा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. त्यामुळे ही कर सवलत मिरा-भाईंदर महानगरपालिकेतदेखील लागू व्हावी याकरिता राजकीय पुढाऱ्यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.

 यासंदर्भात स्थानिक आमदार गीता जैन व आमदार प्रताप सरनाईक यांनीदेखील महापौरांना पत्र लिहून आगामी महासभेत विषय मांडून ठराव मंजूर करण्याची मागणी केली आहे. तर पालिकेतील सत्ताधारी भाजप पक्षाचे सभागृहनेते प्रशांत दळवी यांनीदेखील कर सवलत देण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे येत्या काळात मिरा-भाईंदर शहरातील नागरिकांनादेखील कर सवलत मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मात्र प्रत्यक्षात ही कर सवलत दिल्यास मिरा-भाईंदर महानगरपालिका मोठय़ा आर्थिक गोत्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.