१४ अधिकारी आणि ४३ कर्मचारी करोनाबाधित

विरार : शहरात करोना रुग्णवाढीचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे.   पोलीस कर्मचारीसुद्धा करोनाच्या जाळय़ात सापडत असल्याचे दिसत असल्याने चिंता वाढल्या आहेत. कर्तव्यावर असलेले १४ अधिकारी आणि ४३ कर्मचारी मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात आढळून आले आहेत.  

राज्यभरात ओमायक्रॉन विषाणू पसरण्यास सुरुवात झाली आहे.  वसई-विरार महानगरपालिकेच्या परिसरातदेखील  काही दिवसांपासून रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. पालिकेकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी ४५० रुग्ण आढळून आले आहेत. शहरात शासनाकडून दिलेले करोना र्निबधाचे नियम पाळले जावेत यासाठी सातत्याने पोलीस नागरिकांच्या सहवासात येत आहेत. यामुळे त्यांना बाधा झाल्याचे बोलले जात आहे. मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी काशिमीरा पोलीस ठाण्यात सर्वाधिक पोलीस करोनाबाधित झाले आहेत. या पोलीस ठाण्यात ५ अधिकारी आणि १४ पोलीस कर्मचारी करोनाग्रस्त आढळून आले आहेत. यामुळे बाधित पोलीस ठाण्यात सर्व कर्मचाऱ्यांच्या चाचण्या केल्या जात असल्याची माहिती आयुक्तालयाने दिली आहे. तसेच बाधित पोलिसांवर उपचार सुरू असल्याचेही आयुक्तालयाने सांगितले.