कल्पेश भोईर
करोनानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्यात विविध प्रश्नांची राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. या गदारोळात वसईत पर्यावरणवादी कार्यकर्त्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत बदलते तापमान, येणारे प्रकल्प, शासकीय नियम तसेच वातावरणातील बदलाचा परिणाम यावरील संभाव्य धोक्यांबाबत जाणीव या वेळी करून देण्यात आली. एकंदरीतच धोक्यांची सूचना देऊन वसई वाचविण्यासाठी एका चळवळीचे बीज या बैठकीत रोवण्यात आले हे महत्त्वाचे.
वसई म्हटले की, हिरवागार निसर्ग, फळबागा, विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगररांगा, बावखले, सुंदर तलाव असे चित्र समोर येते. निसर्गाच्या समृद्धीने वसईची हरित वसई म्हणून ओळख निर्माण झाली आहे. नागरिकांना शुद्ध आणि ताजी हवा पुरविणारा हा हरित पट्टा म्हणजे हिरवी श्वसनयंत्रणा अर्थात ‘ग्रीन व्हेंटिलेटर्स’ आहेत. परंतु मागील काही वर्षांत वाढती विकासकामे, नव्याने तयार होत असलेले प्रकल्प, बुजविण्यात येत असलेले जलस्रोत, पर्यावरण संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी होत असलेले दुर्लक्ष, चटई निर्देशांक क्षेत्रात करण्यात आलेली वाढ, वाढते प्रदूषण, अतिक्रमण, बेसुमार वाळू उपसा, पाणी जाण्याचे नैसर्गिक बंद झालेले मार्ग, अशा विविध मार्गाने पर्यावरणाचा ऱ्हास होऊ लागला आहे.
बदलत्या काळाच्या ओघात गावांचे शहरात रूपांतर होऊ लागले आहे. रूपांतर होत असताना पर्यावरणीय दृष्टीने कोणताच विचार होत नसल्याने आज वसईत विविध समस्या निर्माण होऊ लागल्या आहे. त्यामुळे वसईतील अनेक पारंपरिक व्यवसायही अडचणीत सापडू लागले आहेत. शहराचा विकास साधत असताना पर्यावरणाचाही विचार होणे गरजेचे आहे. यात विशेषत: पर्यावरणीय संवेदनशील क्षेत्र टिकविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असताना अशी क्षेत्रसुद्धा टिकविण्याकडे पाठ फिरवली जाऊ लागली आहे. याचाच मोठा परिणाम सर्वत्र दिसून येऊ लागला आहे. कचऱ्याचे व्यवस्थापन नाही, सिमेंट काँक्रीटच्या जंगलामुळे पावसाचे पाणी मुरण्यासाठीच्या खुल्या जागा नाहीत, पाण्याचे स्रोतांचे जलसंधारण नाही. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल कसा राखला जाईल, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नियमातील बदल धोकादायक
शासनाने हरित वसईत चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) वाढविला आहे. ०.३३ टक्के इतका असलेला चटई क्षेत्र निर्देशांक तीन पटीने वाढविण्यात आला आहे. त्यामुळे या हरित पट्टय़ात अनिर्बंध विकास होणार आहे. हरित पट्टयात बांधकामे होतील, औद्योगिक वसाहती उभ्या राहतील. मग हा हरित पट्टा केवळ भूतकाळ बनून राहणार आहे. दुसरीकडे सागरी नियमन क्षेत्राची मर्यादा ५०० वरून ५० फुटांवर आणली आहे. त्यामुळे किनारपट्टीवर तारांकीत पर्यटन क्षेत्रे विकसित होतील. यात उद्ध्वस्त होईल तो सर्वसामान्य भूमीपुत्र त्यामुळे हा बदल खूप धोकादायक ठरणार आहे.
पाण्याची पातळी खालावू लागली आहे
वसईच्या भागात असलेले विविध नैसर्गिक जलस्रोत संवर्धन करण्याकडे प्रशासनाची उदासीनता असल्याने पाण्याची पातळी खालावली जात आहे. वसईच्या पश्चिम पट्टय़ात बावखले तर पूर्व भागात तळी व विहिरी हे नैसर्गिक जलस्रोत टिकवणारे व भूगर्भातील पाण्याची पातळी समतोल राखण्यास मदत होत होती. वसईत अनेक वर्षांपासून बावखले वसई पश्चिम परिसरातील पाण्याची गरज भागवत आहेत. तर पूर्वेतील भागात तळी, विहिरी ही मानवांसह प्राण्यांची, पशू-पक्ष्यांची तहान भागविण्याचे काम करीत आहेत. परंतु वाढते नागरीकरण व त्यासोबत होत असलेली विकासकामे यामुळे हळूहळू हे सर्व जलस्रोत नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. वसईच्या अनेक ठिकाणच्या भागात पाण्याची भीषणता अधिक प्रमाणात जाणवू लागली आहे. सुरुवातीला बोअरवेलमध्ये अवघ्या काही फूट अंतरावर पाणी लागत होते. आता दोनशे ते तीनशे फूट खोलवर जाऊनही पाणी लागत नाही यावरूनच भूगर्भातील पाण्याची पातळी किती प्रमाणात खालावली आहे याचा अंदाज करता येईल.
समुद्र प्रदूषित होतोय
वसईला विस्तीर्ण असा समुद्रकिनारा लाभला आहे. परंतु याच समुद्रातून बेसुमार होणारा वाळू उपसा यामुळे किनाऱ्यांची अक्षरश: वाताहत होऊ लागली आहे. किनाऱ्यावर पट्टीची धूप होऊन किनारेच्या किनारे यात वाहून जात आहेत. याशिवाय मच्छीमारांची राहती घरे, मासळी सुकविण्याच्या जागा यासुद्धा नष्ट होत आहेत. तर दुसरीकडे तेलसाठे शोधण्यासाठी होत सर्वेक्षण यामुळे समुद्रात स्फोट घडवून आणले जात असल्याने समुद्रात असलेल्या मत्स्यजीवांवर मोठा परिणाम होऊ लागला आहे. त्यामुळे मागील काही वर्षांत मासळीची आवक ही कमी होऊ लागली आहे. यामुळे मच्छीमारांचा व्यवसाय संकटात सापडू लागला आहे.
जंगलाना लागणाऱ्या कृत्रिम आगी
तसेच दुसऱ्या बाजूला वसईच्या पूर्वेच्या बाजूला असलेल्या डोंगररांगा व त्या ठिकाणी असलेले जंगल हे वाढती वृक्षतोड, अतिक्रमण, जंगलाला आगी लावण्याचे प्रकार अशा प्रकारांमुळे वनसंपदा नष्ट होऊ लागली आहे. मागील दोन ते तीन महिन्यांच्या कालावधीत अनेक ठिकाणी जंगलाला आगी लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनांमुळे रानमेव्याची झाडेही यात जळून जात असल्याने रानमेवा विक्रीतून रोजगार मिळविणाऱ्या नागरिकांच्या उदरनिर्वाहावर परिणाम होत आहे. वन्य जीवांचे अस्तित्वही कमी होऊ लागले आहे. अनेकदा वन्य प्राणी नागरी वस्तीतत शिरून दहशत निर्माण करीत असल्याच्या घटना समोर येऊ लागल्या आहेत. आताच जर अशा प्रकारांना आळा घातला गेला नाही तर भविष्यात याचे दूरगामी परिणाम जीवसृष्टीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
विविध मार्गाने सध्या वसईच्या पर्यावरणाची हानी सुरू झाली आहे. स्थानिकाचे पारंपरिक व्यवसाय, संस्कृती, जीवसृष्टी अशा सर्वच बाबी धोक्यात आहे. वसईतील पर्यावरणप्रेमी पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी आजही त्यांचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. खरंतर आता सर्वानीच एकत्र येऊन पर्यावरण संवर्धनसाठीची चळवळ अधिक व्यापक करण्याची गरज निर्माण झाली आहे. केशवसुतांची कविता आहे सावध ऐका पुढल्या हाका.. त्यानुसार भविष्यातील धोक्यांच्या या हाका ऐकायला हव्या आणि आतापासूनच सावध राहायला हवे.
शहरबात: सावध! ऐका पुढल्या हाका..
करोनानंतर जनजीवन पूर्वपदावर येत असताना राज्यात विविध प्रश्नांची राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे.
Written by कल्पेश भोईर
First published on: 19-04-2022 at 00:30 IST
Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona political government rules project state meeting environmental activists vasai amy