कल्पेश भोईर
वसई: वसई, विरार शहरात मोठय़ा प्रमाणात रिक्षांची संख्या वाढत आहे. एकीकडे हजारो अनधिकृत रिक्षा रस्त्यावर धावत असताना परवाने खुले झाल्यानंतर अधिकृत रिक्षांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. पावणेतीन वर्षांत उपप्रादेशिक परिवहन विभागाकडून सहा हजार १५ इतक्या परवान्यांचे वाटप करण्यात आले. त्यामुळे शहरात रिक्षांची संख्या उदंड झाली आहे.
सर्वसामान्य नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने खासगी प्रवासी वाहतूक करण्यासाठी राज्य परिवहन विभागाकडून रिक्षांना मोटार वाहन कायद्यानुसार परवाने दिले जातात. २०१७ पासून रिक्षा परवाने खुले करण्यात आले आहेत. मागील तीन ते चार वर्षांत शहरातील रिक्षांची संख्या ही बेसुमार वाढली आहे. एप्रिल २०२० ते जानेवारी २०२३ या कालावधीमध्ये परिवहन विभागाकडून जवळपास ६ हजार १५ इतक्या परवान्यांचे वितरण करण्यात आले आहेत. त्यामुळे दिवसेंदिवस शहरात रिक्षांची संख्या वेगाने वाढत आहे. सुरुवातीला केवळ ८ ते १० हजार असलेल्या रिक्षांची आकडेवारी सुमारे ३८ हजारांच्या घरात गेली आहे.
दरम्यान उपप्रादेशिक परिवहन विभागात रिक्षांचे परवाने काढण्यासाठी अर्ज येतात. त्यांची रीतसर पडताळणी करून परवाने दिले जात आहेत. तीन वर्षांत सहा हजारापेक्षा अधिक परवाने वितरण झाले आहे, असे वसई विभागाचे सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रवीण बागड यांनी सांगितले आहे.
वाहतूक कोंडी
शहरात हजारो बेकायदेशीर रिक्षा धावत आहेत. अरुंद रस्ते, त्यावरील अतिक्रमण आणि अनधिकृत रिक्षाचालक यामुळे दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. वाढत्या रिक्षांच्या संख्येचा परिणाम हा शहरातील रस्त्यावर दिसू लागला आहे. त्यातच काही बेशिस्त रिक्षाचालक हे अस्ताव्यस्त पध्दतीने रिक्षा उभ्या करतात. तर काहीवेळा प्रवासी घेण्याच्या नादात मध्येच रिक्षा थांबविल्या जातात. यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत असते. सातत्याने निर्माण होणारी वाहतूक कोंडी, हॉर्नचा त्रास यामुळे वाढती रिक्षांची संख्या ही शहराची डोकेदुखी ठरू लागली आहे. वसई, नायगाव, नालासोपारा, विरार अशा ठिकाणी स्थानकासह इतर परिसरात मोठय़ा प्रमाणात रिक्षांची गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येते.
सर्वाधिक रिक्षाचालक परराज्यातील
राज्यात रिक्षासाठी परवाने खुले केले आणि नियम शिथिल केल्याने मोठय़ा प्रमाणावर रिक्षाचालक शहरात दाखल होऊ लागले आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातील रिक्षाचालकांची संख्या मोठी आहे. उत्तरेकडील राज्यातील बेरोजगार मोठय़ा संख्येने वसई विरार शहरात रिक्षाचालक म्हणून कार्यरत आहेत. यापैकी अनेकांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. एजंटच्या माध्यमातून बनावट कागदपत्रे सादर करून दाखले मिळवून रिक्षा परवाना काढला जात आहे.
जागोजागी रिक्षा थांबे
रिक्षांची संख्या वाढली असली तरी अधिकृत रिक्षाथांबे नाहीत. त्यामुळे रिक्षाचालक मिळेल त्या ठिकाणी रिक्षा उभ्या करून अनधिकृतपणे रिक्षा थांबे केले जाऊ लागले आहेत. त्यामुळे रिक्षा थांब्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे.
थाब्यांना विरोध
वसई-विरार महापालिकेकडून १४५ ठिकाणी रिक्षा थांबे तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र काही ठिकाणी थांबे तयार करण्यासाठी विरोध असल्याने अडचणी निर्माण होत आहेत असे पालिकेकडून सांगण्यात आले आहे.