कल्पेश भोईर
वसई : मागील काही वर्षांपूर्वी ऑटोरिक्षाचे परवाने खुले करण्यात आले असल्याने परवाना काढून नवीन रिक्षा खरेदी करण्याकडे रिक्षाचालकांचा कल वाढला आहे. मागील तीन वर्षांत वसई विरारमध्ये ६ हजार ७०२ इतक्या नवीन रिक्षा दाखल झाल्या आहेत.
वसई विरार शहर हे झपाटय़ाने विकसित होत आहे. त्यासोबत लोकसंख्या व वाहनांची संख्या वेगाने वाढू लागली आहे.
सुरुवातीला राज्य परिवहन विभागाने रिक्षांचे परवाने बंद केले होते. त्यामुळे काही मोजक्याच परवानाधारक असलेल्या रिक्षा रस्त्यावर धावत होत्या. परंतु परवाना मिळत नसल्यामुळे काही रिक्षाचालकांना नाइलाजाने अनधिकृतपणे रिक्षा चालवावी लागत होती. परंतु परवाने खुले होताच रिक्षा परवाने काढून नवीन रिक्षा खरेदी करण्याचे प्रमाण सर्वाधिक झाले आहे. दिवसेंदिवस रिक्षांच्या संख्येत भर पडत असल्याने वसई, विरार, नायगाव, नालासोपारा अशा सर्वच ठिकाणी रिक्षांचा सुळसुळाट झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सन २०१९-२० ते २०२१-२२ या तीन वर्षांच्या कालावधीमध्ये वसईच्या उपप्रादेशिक परिवहन विभागात ६ हजार ७०२ इतक्या नवीन रिक्षांची नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती उपप्रादेशिक विभागाकडून देण्यात आली आहे.
शहरात रिक्षांची संख्या वाढत असली तरी शहरातील रस्तेही अपुरे पडू लागले आहेत. याचा परिणाम हा वाहतुकीवर होऊ लागला आहे.
त्यातच काही बेशिस्त रिक्षाचालक हे उलटसुलट रिक्षा उभ्या करीत असल्याने वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. विशेषत: स्थानक परिसरात अशा प्रकारे रिक्षा उभ्या केल्या जात आहेत. त्यामुळे नागरिकांनाही या रिक्षांच्या गराडय़ातून वाट काढत बाहेर पडावे लागत आहे.
रिक्षा थांब्याचे नियोजन नाही
वसई विरार शहरात काही ठिकाणी रिक्षा उभी करण्यासाठी नियोजित रिक्षा थांबे तयार करण्यात आले नसल्याने रिक्षाचालक मिळेल त्या ठिकाणी रिक्षा उभ्या करू लागले आहेत. तर काही ठिकाणी ये-जा करण्याच्या मार्गातच रिक्षा थांबवून प्रवाशांना बसविणे व उतरविणे असे प्रकार केले जातात. यामुळे मागून आलेल्या इतर प्रवासी नागरिकांचा यामुळे खोळंबा होतो.
परवाने खुले झाल्यापासून नवीन रिक्षा खरेदी करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे परिवहन विभागात नोंदणीसाठी येणाऱ्या रिक्षांची संख्याही वाढत आहे. – प्रवीण बागडे, सहायक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा