भाईंदर :- मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील दहिसर टोलनाक्याजवळ गेल्या १६ तासाहून अधिक काळापासून गाय मृत अवस्थेत पडून असल्याचे समोर आले आहे. या गाईला अजूनही त्या ठिकाणाहून उचलण्यात न आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हेसुद्धा अजूनही समोर आले नाही.

काही दिवसांपूर्वीच राज्य शासनाने गाईला ‘राज्यमाते’ चा दर्जा देत असल्याचा शासन निर्णय काढला आहे. यामुळे राज्यातील गाईंना विशेष महत्व दिले जाणार असल्याची भावना गौ-प्रेमींमध्ये निर्माण झाली आहे. मात्र मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील लता मंगेशकर नाट्यगृहाबाहेरील रस्त्यावर शुक्रवारी रात्रीपासून एक गाय मृत अवस्थेत पडल्याची दिसून आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी दुपारपर्यंत या गाईला प्रशासनाने हटवले नाही. त्यामुळे स्थानिक नागरिक संतप्त झाले आहेत. याबाबत काही पशु-प्रेमींनी मिरा भाईंदर महापालिकेच्या पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून ही गाय हटवण्याची विनंती केली आहे. त्यावरून महापालिका प्रशासनाने वसई येथील कोराकेंद्र या सामाजिक संस्थेला संपर्क साधून ही गाय नेण्यास सांगितले आहे.

हेही वाचा – वसई : मोबाईल टॉवरमधील आझना कार्ड चोरणारी टोळी गजाआड, परदेशातून गुन्ह्यासाठी व्हायचा वापर

गाईचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे याबाबत पोलिसांना खबर देणार असल्याची माहिती महापालिकेचे पशुसंवर्धन अधिकारी विक्रम नरटले यांनी दिली आहे.

हेही वाचा – वसई : नालासोपार्‍यात १३ वर्षीय मुलीवर बलात्कार, अश्लील छायाचित्राआधारे उकळली २५ हजारांची खंडणी

वाहतूक कोंडीमुळे कोरा केंद्राची गाडी पोहचणार कशी ?

पंतप्रधान यांचा ठाणे मुंबई दौरा असल्याने मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड कोंडी झाली होती. मोठ्या संख्येने वाहने व प्रवासी या कोंडीत अडकून पडले होते. या मृत गायीच्या विल्हेवाटीसाठी वसईतील कोरा केंद्राला सांगितले असल्याचं पालिकेने सांगितले. मात्र कोंडी प्रचंड असल्याने गायीची वाहतूक करणारी गाडी त्या ठिकाणी पोहचणार तरी कशी असा प्रश्न उपस्थित झाला आहे.