वसई– मिरा रोड मध्ये शुक्रवार ११ एप्रिल रोजी एका महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरणार्‍या दोन सोनसाखळी चोरांना गुन्हे शाखा १ च्या पथकाने अटक केली आहे. दोन्ही आरोपी मुळ राजस्थानचे आहेत. ते शहरात प्रसिध्द कंपनीत ‘फूड डिलिव्हरी बॉय’ म्हणून काम करत होते. फिर्यादी माधवी गोरपुनी (५८) या मिरा रोडच्या सालासार अर्पण इमारतीत राहतात. दररोज सकाळी ते फिरण्यासाठी जात असतात. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे ते घराजवळील एल आर तिवारी महाविद्यालयाच्या मागील रस्त्यावरून चालत होत्या. सकाळी साडेसहाच्या सुमारास दोन अज्ञात मोटारसायकस्वारांनी त्यांच्या गळ्यातील २ लाख ५० हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून घेतले. यावेळी झालेल्या झटापटीत माधवी गोपुरनी किरकोळ जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी मिरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. याप्रकरणाचा तपास गुन्हे शाखा-१ च्या पथकाकडे सोपविण्यात आला होता.

गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तसेच इतर तांत्रिक दुव्यांच्या आधारे तपास केला आणि सुनिल राज (२२) नीरज राजवट (२५) या दोघांना अटक केली. दोन्ही आरोपी हे मूळचे राजस्थान येथे राहणारे आहे. ते प्रसिध्द कंपनीत फूड डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतात, अशी माहिती गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली. मौज मजा करण्यासाठी त्यांनी ही चोरी केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांच्यावर यापूर्वी कुठे गुन्हे दाखल आहेत का त्याचा पोलीस तपास करत आहेत.

ही कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मिलिंद बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, संजय शिंदे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार सचिन हुले, अश्विन पाटील, पोलीस शिपाई गौरव बारी, सौरभ इंगळे, धीरज मेंगाणे, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सचिन चौधरी, संतोष चव्हाण आदींच्या पथकाने की कारवाई केली.

सोनसाखळी चोरी रोखण्यासाठी उपायोयजना

सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. सकाळी प्रभात फेरीसाठी जाताना, मंदिरात जाताना मौल्यवान दागिने घालून जाऊ नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसे फलक जागोजागी लावण्यात आले आहेत. याशिवाय गस्तीसाठी विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकात खासगी मोटारी व दुचाकीद्वारे गस्त घालण्यात येत आहे.  प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशेष स्थळांवर नियमित कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. गर्दीच्या भागात बीट मार्शल, साध्या वेशात तसेच नियमित गणवेशात जादा कर्मचारी नियुक्त करून त्यांच्या निरीक्षणसाठी अधिकारी नेमण्यात आले आहेत.