वसई : विरारच्या पिरकुंडा दर्ग्याजवळ आढळलेल्या महिलेच्या कवटी प्रकरणाचा छडा मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा ३ च्या पथकाने लावला आहे. कौटुंबिक वादातून नालासोपारा येथे राहणाऱ्या इसमाने आपल्या पत्नीची हत्या करून मुतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिचे शीर कापून धडावेगळे केले होते. दोन महिन्यांनी हा प्रकार उघडकीस आला होता. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने गुन्हा दाखल होताच मुतदेहाची ओळख पटवून आरोपी पतीला २४ तासात अटक केली आहे.

नालासोपारा पूर्वेच्या रेहमत नगर येथे राहणारा हरिश हिप्परगी (४९) हा इमिटेशन ज्वेलरीचा व्यवसाय करतो. तो उत्पला हिप्परगी (५१) आणि २२ वर्षीय मुलासोबत रहात होता. उत्पला हिला पहिल्या पतीपासून एक मुलगा होता. ती मुळची पश्चिम बंगालची होती. दोघांमध्ये मुलावरून कौटुंबिक वाद होता. ८ जानेवारी २०२५ रोजी दोघांमध्ये वाद झाला.

भांडणात हरिशने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह  एका गोणीत टाकून विरार पूर्वेच्या मोहक सिटी परिसरात असलेल्या रेल्वे रूळाजवळ नेला. मध्यरात्री ३ वाजता त्याने तिचा कोयत्याने गळा चिरला आणि तिचे धड नाल्यात टाकले. त्यानंतर प्रवासी बॅगेत तिचे शिर टाकले. ही बॅग घेऊन तो  विरार फाट्याजवळ असलेल्या पिरकुंडा दर्ग्याजवळील निर्जन जागेत नेला. तेथून शंभर मीटर अंतरावर असलेल्या झुडपात त्याने ती बॅग टाकून दिली.

२ महिन्यांनी बिंग फुटले

घरी आल्यावर त्याने मुलाला आई घर सोडून गावी निघून गेल्याची थाप मारली होती. तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याने तो निश्चिंत होता. मात्र गुरूवारी होळीच्या दिवशी संध्याकाळी पिरकुंडा दर्गाजवळून जाणारे काही तरुण लघुशंकेसाठी आडोशाला गेले होते. त्यांना त्या प्रवासी बॅगेत महिलेची कवटी दिसली. हत्येचा ६४ दिवसानंतर मुंडके कुजून कवटीत रुपांतर झाले होते.

..सराफाची पिशवी आणि दुचाकीवरून शोध

आरोपी हरिशने पत्नीची हत्या करून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. प्रवासी बॅगेत तिचे शिर त्याने टाकले होते मात्र अन्य वस्तू काढायला तो विसरला होता. हीच चूक त्याला भारी पडली. पोलिसांना घटनास्थळावरून एक छोटी सराफाची पिशवी आढळली. गुन्हे शाखा ३ च्या पथकाने या पिशवीवरून पश्चिम बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील सराफ मालकाला संपर्क केला. तिथून सोने खरेदी करून मुंबईला गेलेल्या ग्राहकांची यादी पोलिसांनी मागवली. तशा ८ जणांची यादी मिळाली. त्या सर्वांना पोलिसांनी कॉल करण्यास सुरवात केली. त्यापैकी सर्वांचे फोन सुरू होेते फक्त उत्पला हिप्परगी या महिलेचा फोन बंद होता. तेथून पोलिसांना संशय आला.

पोलिसांनी मग त्या फोन वरून तिचा पती हरिश हिप्परगी याचा नंबर शोधून काढला. तो देखील बंद होता. पोलिसांनी मग रेहमत नगर येथील त्याचा पत्ता शोधला. परंतु तेथून तो घर सोडून निघून गेला होता. दरम्यान, पश्चिम बंगाल पोलिसांच्या मदतीने पोलिसांनी उत्पला हिप्परगी हिचे मूळ घर शोधून काढले. परंतु दोन महिन्यापासून ती संपर्कात नसल्याचे समजले. त्यामुळे सापडलेली कवटी तिचीच असल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.

दुचाकी ठरली निर्णायक

आरोपी हरिश घर बदलून गेला होता. त्यामुळे त्याला शोधणे आव्हानात्मक होते. चौकशीत आरोपीने एक दुचाकी विकत घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. रातोरात पोलिसांनी परिसरात त्या दुचाकीचा शोध सुरू केला आणि नालासोपाऱ्याच्या रेहमत नगर येथे एका इमारती खाली दुचाकी पार्क केेलेली आढळली. त्यानंतर पोलिसांनी त्या इमारतीतून रात्रीच हरिश हिप्परगी याला ताब्यात घेऊन अटक केली.

चौकशीत त्याने हत्येची कबुली दिली, अशी माहिती गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे यांनी दिली. उत्पला हिप्परगी हिचे धड रेल्वे रूळालगतच्या नाल्यात टाकले असून त्याचा पोलीस शोध घेत आहेत. गुन्हे शाखा ३च्या पथकाने गुन्हा दाखल झाल्याच्या २४ तासातच गुन्ह्याची उकल करून आरोपीला अटक केलीपोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक आयुक्त (गुन्हे) मदन बालाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ३ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, साहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे तसेच मुकेश तटकरे, रमेश आलदर, सागर बारवकर, प्रशांत पाटील, अमोल कोरे, राकेश पवार, सुनिल पाटील, युवराज वाघमोडे, सुमित जाधव, आतिश पवार, तुषार दळवी, मनोहर तारड, महाराष्ट्र सुरक्षा बलाचे सागर सोनवणे, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सायबर शाखेचे संतोष चव्हाण आदींच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करून गुन्ह्याची उकल केली.